शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार, आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरील खर्चावरून सवाल उपस्थित केले होते. यानंतर भाजपा आमदार, आशिष शेलार यांनी ‘आदू बाळ’ असा उल्लेख करत आदित्य ठाकरेंवर टीका केला होती. याला आदित्य ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आशिष शेलार काय म्हणाले?

“आदू बाळा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्‍याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारनं केला. कारण, मुळातच त्यांना निमंत्रण हे शासकीय अतिथी म्हणून जपान सरकारने दिले होते. अतिथी म्हणून निमंत्रण येते, तेव्हा त्यांचा खर्च हा जपान सरकार करीत असते. महाराष्ट्र सरकारने केवळ सोबत जाणार्‍या अधिकार्‍यांचा खर्च केलेला आहे. बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्‍याने दुसर्‍यांना शहाणपण शिकवायचे नसते. बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. पण, त्याचा कळस गाठू नका,” असं टीकास्र शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर सोडलं होतं.

हेही वाचा :“लंडनमधील वाघ नखे शिवाजी महाराजांची असतील तर…”, इंद्रजित सावंत यांचं सरकारला थेट आव्हान

“माझ्या आजोबांचं नावही बाळ होतं, ते…”

यावर संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, “आदू बाळानं सरकारला सळो की पळो केलं आहे. देशात ‘पप्पू’नं सरकारला हलवून सोडलं आहे. माझ्या नावात बाळ लावलं याचा मला अभिमान आहे. कारण, माझ्या आजोबांचं नावही बाळ होतं. ते माझ्या रक्तात आहे. पण, त्यांच्या भाषेतून तणाव आणि खालच्या पातळीचे विचार दिसत आहेत.”

हेही वाचा :  “वाघनखे शिवाजी महाराजांची की शिवकालीन?” आदित्य ठाकरेंच्या विधानाला फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमची संस्कृती आणि पातळी सोडणार नाही”

“ही भाषा नव्या भाजपाची आहे का? आम्ही अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची भाजपा ओळखायचो. नवा भाजपा असा असेल, आम्हाला वाटलं नव्हतं. पण, आमची संस्कृती आणि पातळी सोडणार नाही,” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.