छत्रपती संभाजीनगर : माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, भाजपचे माजी बीड जिल्हाध्यक्ष आर. टी. देशमुख यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी परळी येथील त्यांच्या निवासस्थानाच्या बाजूला अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, खासदार ओम राजेनिंंबाळकर, आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, अक्षय मुंदडा, आदींसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. भाजपसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

२६ मे रोजी सायंकाळी आर. टी. देशमुख यांचे औसा तालुक्यातील बेलकुंड-उजनी परिसरात मोटार उलटून झालेल्या अपघातात निधन झाले होते. मंगळवारी देशमुख यांच्या मृतदेहाची लातूर येथे उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यांचा एक मुलगा रोहित हे जपानला असल्याने ते आल्यानंतर अंत्यविधी बुधवारी करण्यात आले.