Raj Thackeray On Reservation: महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही, असे विधान सोलापूर येथील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी केले. त्यावरून ठाकरेंच्या विरोधात धाराशिव येथील मराठा आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली. सायंकाळी राज ठाकरे धाराशिव येथे मुक्कामासाठी आले असता, त्यांना भेटून जाब विचारण्यासाठी मराठा तरूण जोरदार घोषणाबाजी करीत हॉटेलमध्ये घुसले. मनसे प्रमुख राज ठाकरे सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास धाराशिवमध्ये दाखल झाले. तत्पूर्वी त्यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यापूर्वी सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय? असा प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ धाराशिव शहरात मराठा समाजातील तरूण आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. शहरातील पुष्पक हॉटेल येथे राज ठाकरे यांचा ताफा दाखल झाल्यानंतर त्यांना जाब विचारण्यासाठी मराठा तरूणांची गर्दी झाली होती. राज ठाकरे यांनी आंदोलकांची भेट नाकारल्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला आणि तणाव निर्माण झाला होता. ठाकरे हॉटेलच्या तिसर्या मजल्यावर मुक्कामी थांबले आहेत. https://www.youtube.com/watch?v=ycNSks8cDBM&t=45s हेही वाचा : धाराशिव: पूर्वपत्नीच्या परवानगीविना थाटला संसार, झेडपीच्या शिक्षक-शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई मुक्कामी थांबलेल्या हॉटेलमधील त्यांच्या दालनापर्यंत जाण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांवर नियंत्रण मिळविले. या दरम्यान मराठा आरक्षणावरून हॉटेल परिसरात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. एका मराठा तरूणाने सर्वांचा प्रतिनिधी म्हणून ठाकरे यांची भेट घ्यावी, असा प्रस्ताव समोर आला होता. मात्र सर्वांनाच ठाकरेंना भेटावयाचे असल्याचा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला. ठाकरेंसमवेत आलेल्या मुंबईतील काही पदाधिकारी आणि नेत्यांनाही मराठा कार्यकर्त्यांनाही या दरम्यान दमबाजी केल्याचा आरोप केला जात आहे. वातावरण तणावग्रस्त असले तरी पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे.