छत्रपती संभाजीनगर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीतील वैद्यनाथ मंदिर देवस्थानच्या सर्वे क्र. ३२२ वर नगर पालिका घरकुलांना मंजुरी देत आहे. काही भूमाफिया हे सर्वे ३२१ वरील जागांची विक्री करत असल्याचे दाखवत असले तरी प्रत्यक्षात देवस्थानच्या सर्वे क्र. ३२२ ची जागा वापरण्यासाठी फूस लावत असल्याचा आरोप काही पुजाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

सर्वे क्र. ३२२ ही जागा मंदिर देवस्थानची खिदमास (दिवा-बत्तीसाठी दिलेली) जमीन असून, त्यावर औरंगाबाद खंडपीठ आणि दिवाणी न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याचे संबंधित कागदपत्र सादर करून सांगण्यात आले.

स्वप्नील पुजारी व इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या या पत्रकार बैठकीत सांगितले की, यापूर्वी ५० ते ६० जणांनी देवस्थानची जमीन विश्वस्तांच्या ताब्यात मिळावी, यासाठी आंदोलन केले आहे. अजूनही शासनाच्या ताब्यात संबंधित जमीन असून, ती न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिर व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करणे अपेक्षित असतानाही तसे झालेले नाही.

सर्वे क्रमांक ३२२ मधील जमिनीपैकी केवळ सहा एकर जमीन राहिली आहे. सव्वादोन एकरवर घरे बांधण्यात आली आहे. सुरुवातीला या जागेवर दोन घरे होती, आता ४० घरे असल्याचे सांगत पुजारी मंडळींनी नकाशाचे काही कागदपत्रेही सादर केली.

मंदिरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या या जागेवर परळी नगरपालिका घरकुले मंजूर करत असून, देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदारांचीही याप्रकरणी भेट घेऊनही उपयोग झाला नसल्याचा आरोप पत्रकार बैठकीत करण्यात आला.

संबंधित पुजाऱ्यांच्या दाव्यानुसार मंदिर संस्थानची जागा असताना तेथे पालिका घरकुल मंजूर करत असेल तर त्याला निश्चितच प्रतिबंध करण्यात येईल. मंदिर संस्थानचा अध्यक्ष म्हणून तर प्रतिबंध होईलच, पण तहसीलदार म्हणूनही यात भूमिका घेऊ. या प्रकरणाची सर्व माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल. – व्यंकटेश मुंडे, संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार.

पुजाऱ्यांनी केलेल्या आरोपासारखे काहीही घडत नाही. संस्थानच्या जागेवर घरकुल मंजूर करण्यासारखा कुठला विषयही पालिका प्रशासनाच्या पुढे आलेला नाही. संस्थानच्या जागेवर घरकुल मंजूर करण्याचा प्रश्नच नाही. – त्रिंबक कांबळे, मुख्याधिकारी, परळी न. प.