छत्रपती संभाजीनगर – अतिवृष्टीतील नुकसानीनंतर झेंडूच्या फुलांचे दर दसरा-दिवाळीत तेजीत राहतील, असा अंदाज बांधलेला असतानाच मंगळवारच्या (२१ ऑक्टो) लक्ष्मीपूजनाला मात्र, दर कमालीचे गडगडले आहेत. झेंडुच्या फुलांचा दर किरकोळ बाजारात अवघा २५ ते ३० रुपये किलोपर्यंत घसरलेला असून, तोडणीसह वाहतुकीचा खर्च वजा करता किलोमागे एक रुपयाही नफा मिळत नसल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. प्लास्टिक झेंडूच्या फुलांची मात्र बाजारात चलती असून, केवळ १२-१५ फुलांचा आकर्षित हार ६० ते ८० रुपयांमध्ये मिळत आहे. प्रमुख रस्त्यांवरील पदपथं खऱ्या फुलांपेक्षा प्लास्टिक झेंडूच्याच फुलांच्या ढिगांनी आणि माळांच्या दुकानांनी व्यापली आहेत.

येथील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील फुलबाजारात झेंडूच्या फुलांना क्विंटलमागे अवघा दीड ते दोन हजार रुपये दर मिळाला. गतवर्षी दिवाळीत झेंडूचा दर किलोमागे १०० ते १२० रुपये एवढा होता. शिवाय अपेक्षेपेक्षा अधिकची झेंडूची आवक होत आहे, असे ठोक विक्रेते समाधान विखे यांनी सांगितले. फुलशेती करणारे पैठण तालुक्यातील वडजी येथील मनोज गोजरे म्हणाले, यंदा अतिवृष्टीनंतरच्या कालावधीत स्वच्छ सूर्यप्रकाश राहिला. ऊन आणि रात्री गारव्याचे वातावरण होते. या वातावरणाचा परिणाम झेंडूच्या उत्पादनावर दिसून आला. झेंडूचे उत्पादन कमालीचे वाढले. कन्नड, सिल्लोड तालुक्याच्या भागात इतर ठिकाणच्या तुलनेत अतिवृष्टी फारसी झाली नाही. शिवाय ज्या भागात अतिवृष्टी झाली तेथे फूल शेती फारसी नसल्याने नुकसान टळले.

किलोमागे एक रुपयाही नफा नाही

झेंडूच्या फुलांचे उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक झाल्याने बाजारपेठांमध्ये आवक वाढली आहे. परिणामी दर गतवर्षीच्या तुलनेत खूपच घसरले आहेत. तोडणी, वाहतुकीचा खर्च वजा केला तर एक रुपयाही नफा मिळत नाही. दोन-दोन महिने सांभाळलेल्या पिकातून क्विंटल-दोन क्विंटल माल निघाला तर शंभर ते दोनशे रुपयेच नफा मिळत असेल तर काय म्हणावे. – मनोज गोजरे, उत्पादक.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा झेंडुच्या फुलांचे दर कमालीचे गडगडले आहेत. दीड ते दोन हजार रुपये क्विंटल दराने खरेदी होत आहे. बाजार समितीत झेंडूच्या फुलांची आवक हिंगोली, बीड या जिल्ह्यांमधूनही होत आहे. – समाधान विखे, ठोक विक्रेते.

प्लास्टिक झेंडूच्या फुलांच्या माळा या इंदोरसह अन्य मोठ्या शहरांमधून येथे आणल्या जातात. ४० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंतच्या प्लास्टिक झेंडूच्या माळा आहेत. काही माळांमध्ये प्लास्टिक निशिगंधाचीही फुले लावण्यात आल्याने हार आकर्षक दिसत असून, त्याला पसंती मिळत आहे. – पुष्कर शर्मा, विक्रेता.