राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यात भगवा रंग अधिक गडद

औरंगाबाद : महापालिकेच्या सत्ताकारणात अनेक असुविधांची भर सत्ताधाऱ्यांनी टाकल्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत हिंदुत्वाचा राजकीय मुद्दा घेत मनसचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा केला. संघटन बांधणीच्या पातळीवर पदाधिकाऱ्यांबरोबर वैयक्तिक गाठीभेटी घेऊन त्यांनी चर्चा केली.

गुरुवारी सायंकाळी राज ठाकरे औरंगाबादेत आले. तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले. रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी झाली. दुचाकी फेरी काढणाऱ्या कार्यकर्त्यांनीही ‘राजसाहेब अंगार है’च्या घोषणा दिल्या. औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याचा शिवसेनेचा मुद्दा मनसेने फलकावर लावून धरला. त्यावर शिवसेना नेत्यांनी मौन बाळगले आणि राज ठाकरे यांनीही शुक्रवारी या प्रश्नी आपण निवडणुकीदरम्यान बोलू, असे म्हटले. पण असे करताना हिंदुत्वाचा झेंडा तर उंचावलाच पण हिंदूुत्व म्हणजे विकासाकडे दुर्लक्ष नाही, असे सांगत महापालिका निवडणुकीत मनसेचा चेहरा कसा असेल याची चाचपणी केली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपकडून शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून डिवचले जात होते. आता संभाजीनगरचा मुद्दा भाजपने उचलून धरला. त्यावर शिवसेनेकडूनही उत्तर दिले गेले. हिंदुत्वाचा मुद्दा आम्ही सोडलेला नाही, असे कार्यकर्ते वारंवार सांगू लागले. मात्र, नेत्यांनी शहराचे नाव बदलण्याच्या मुद्दय़ावर फारशी आक्रमक भूमिका घेतली नाही.

औरंगाबाद शहरात मनसेचे संघटनात्मक बळ तसे फारसे नाही. मात्र, गुरुवारी औरंगाबाद येथे दाखल झालेल्या राज ठाकरे यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद मलाही अनपेक्षित होता, असे राज ठाकरे यांनी पत्रकारांशी चर्चा करताना आवर्जून सांगितले. ‘हिंदू जननायक’ अशी बिरुदावली औरंगाबादच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना चिकटवली. फलकांवर त्यांचा अशा प्रकारे केला गेलेला उल्लेख राज ठाकरे यांना मात्र फारसा आवडला नाही. रागाने हात जोडत त्यास त्यांनी विरोध दर्शवला. त्यांचा हिंदू जननायक असा उल्लेख योग्य वाटतो का, असे विचारले असता, मला तसे वाटत नाही, असे ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीने अशा पद्धतीचा उल्लेख केला होता. तुम्ही त्यांनाच का नाही विचारत, असा प्रतिप्रश्न करत त्यांनी औरंगाबादच्या कार्यकर्त्यांनी लावलेली ही बिरुदावली फारशी मान्य नसल्याचे दर्शवून दिले.

रझा अकादमीच्या विरोधात काढलेला मोर्चा, पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात केलेले आंदोलन याचे दाखले देत मशिदीवरील भोंगे बंद करायला हवेत, ही आपली मागणी जुनीच असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

मनसेने भूमिका आणि झेंडा दोन्हीही बदललेले नाहीत, असे सांगत बदललेल्या झेंडय़ाची माहिती तीन वर्षांपूर्वी निवडणूक आयोगालाही दिली होती. आमचा आणखी एक झेंडा आहे, असे कळविले होते. पण अधिकृत पत्र अलिकडेच दिल्याचे सांगितले.

प्रचाराची दिशा..

भाजप-सेनेमध्ये निर्माण झालेले वितुष्ट आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत मनसेच्या उमेदवाराला अधिक संधी मिळू शकते का, याची चाचपणी करताना भोंगे हटविण्याचा मुद्दा राज ठाकरे वारंवार सांगत असल्यामुळे त्यांच्या प्रचाराची दिशा हळूहळू स्पष्ट होऊ लागली आहे. ११५ विभागांपैकी (वॉर्ड) ५७ ते ७० विभागांवर मनसेकडून लक्ष केंद्रित केले जाईल, असे मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी अलिकडेच सांगितले होते. शुक्रवारी दिवसभरात विभागांच्या नकाशांसह पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली जाणार होती. महापालिकेची रणनीती ठरविताना हिंदुत्वाचा मुद्दा किती पुढे न्यायचा आणि विकासाला किती महत्त्व द्यायचे याची चाचपणी राज ठाकरे यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारा’

कचरा, पाणी या मूलभूत समस्या सोडविण्यास औरंगाबाद महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना अपयशी ठरत असल्याची चर्चा नेहमीच असते. त्यांना का प्रश्न विचारले जात नाही, असा सवाल करत राज ठाकरे यांनी समस्यांमुळे निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत मनसे उतरणार असल्याचे संकेत दिले.