छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील वनस्पती संपदेत ‘दुरंगी माकडशिंगी’ची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीरमधील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात माकडशिंगी आढळून आली असून, जैवविविधतेच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून वनस्पती अभ्यासक, संशोधक त्याकडे पाहत आहेत. या वनस्पतीवर केलेल्या संशोधनाचा प्रबंध इंडियन जर्नल ऑफ फाॅरेस्ट्री या संशोधन पत्रिकेतही प्रसिद्ध झाला आहे.
उदगीर येथील वनस्पती अभ्यासक, पर्यावरण शास्त्राचे प्रा. डाॅ. जय पटवारी, दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन करणारे शिवशंकर चापुले व मिलिंद गिरधारी यांना एका वनस्पती शास्त्रीय सर्वेक्षणात ही दुरंगी माकडशिंगी वनस्पती आढळून आली. या वनस्पतीचे संवर्धन कार्य हाती घेण्याचा मनोदय जळगाव येथील वनस्पतिशास्त्राचे प्रा. तन्वीर खान व रेवन चौधरी यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रा. डाॅ. जय पटवारी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
याबद्दलची शास्त्रीय माहिती देताना प्रा. डाॅ. पटवारी यांनी सांगितले, की या वनस्पतीला सामान्यत: शिंदळमाकडी म्हणूनही ओळखले जाते. तिचे शास्त्रीय नाव ‘कॅरालुमा बायकलर’ आहे. ही वनस्पती उदगीरमध्ये ऑक्टोबर (२०२४) महिन्यात प्रथम आढळल्यानंतर त्यावर मागील आठ महिने संशोधन केले. वनस्पती अभ्यासकांच्या संशोधनाअंती तयार केलेला प्रबंध ‘फाॅरेस्ट्री’मध्ये प्रसिद्ध झाला असून, त्यात महाराष्ट्रात प्रथमच आढळलेली ही औषधी गुणधर्मी वनस्पती असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी तमिळनाडू, केरळ व अलीकडे आंध्र प्रदेशात ही वनस्पती आढळून आलेली आहे. महाराष्ट्रात मात्र ती प्रथमच दिसून आली.
औषधी गुणधर्म
भूक कमी करणारी असल्याने वजन व्यवस्थापनात मदत. रक्तातील साखर आणि ग्लायसेमिक नियंत्रण सुधारण्यास हातभार लावणारी. ॲण्टिऑक्सिडंट आणि दाहकविरोधी गुणधर्म आहेत. जखमा भरून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी. मधुमेहविरोधी आणि प्रतिजैविक प्रभावांसाठी उपयोगी. अल्सर, कर्करोग आणि मलेरियासह इतर आजारांवर उपचार करण्याकामीही माकडशिंगीवर अभ्यास करण्यात आला आहे. प्रा. डाॅ. जय पटवारी, वनस्पती, पर्यावरणशास्त्रज्ञ