छत्रपती संभाजीनगर : पाण्याने पाठ सोडली नाही. आहे त्या अवस्थेत घर सोडावं लागलं. सारा संसार तरंगता बघत होतो. जीव वाचला. पण आता साऱ्या संसाराचा चिखल झाला असल्याची प्रतिक्रिया हसनाळवाडीच्या विमलबाई दिगंबर इब्बिनवार यांनी व्यक्त केली. बुधवारी या गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर आला. कोणीतरी कपडे पाठवले होते. अगदी सहावार-नऊवार साड्याही आल्या. रात्री पांघरुण घेण्यासाठी रगही मिळाले. मदत मिळत असली तरी अन्नधान्य आणि शेतीतील सारे पीक गेल्याने चिंता वाढली आहे.
सुभाव कवले म्हणाले, बनियन आणि पॅन्टीवर दोन दिवस होतो. पावसात भिजल्याने कापरे भरले होते. पण आता कपडे मिळाले आहेत. पण दुसऱ्याने दिलेल्या दानावर जगायची वेळ आली. सगळा संसार तरंगत गेला. आता मदत पोहचली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आला. आरोग्य तपासणीही झाली. सध्या खायला मिळते आहे. पण हे असे किती दिवस करावे लागेल, याची चिंता आहे. बुधवारचा दिवस गावकऱ्यांनी कोरड्या जागेत सापडलेले सामान गोळा करण्यात घालावला. कोणाला घरातील हंडे सापडले तर कोणाला वाहून न गेलेले सामान. शेती पिकांचे नुकसान तर झालेच पण जमीनही खरवडून गेल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
घराघरांत आता फक्त चिखल आहे. चिखलातला संसार आणि वाढणाऱ्या चिंतेतून कोणीतरी बाहेर काढावे, अशी विनवणी गावकरी येईल त्या अधिकाऱ्यासमाेर करत आहेत. आधी पुनवर्सन आणि मग धरण, हे धोरण नीट राबवलं असतं तर एवढे नुकसान झाले नसते, ही प्रतिक्रिया सर्व गावकऱ्यांची.