छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकी दरम्यान सत्ताधारी नेत्यांनी दिलेली आश्वासने केवळ पोपटपंची ठरू नये. कर्जमुक्तीसह देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करावीत, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे ) गटाच्या वतीने शहरातील क्रांतीचौकातून १०० ट्रॅक्टरसह मोर्चा काढण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. या माेर्चामध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरेही सहभागी झाले.
पेरणीच्या काळात मराठवाड्यात युरियासह अनेक खते वाढीव किंमतीने विकली जात असून, रक्कम भरूनही सौर कृषी पंप मिळत नसल्याच्या तक्रारी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडे करण्यात आल्या. या योजनेचा मराठवाडा स्तरावरचा आढावा घ्यावा, असा सल्लाही शिष्टमंडळाने या वेळी दिला. घरकुल योजनांना मिळणारा दुसरा हप्ता वेळेवर मिळत नसल्याने ही योजना अर्धवट स्थितीमध्ये राहत आहे. त्याच्या अनेक तक्रारी ‘क्या हुआ तेरा वादा’ या आंदोलना दरम्यान करण्यात आल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगितले. कृषी सौर योजनेतून अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा हिस्सा भरूनही पंप मिळत नाही. केवळ संभाजीनगर २५० कोटी रुपयांपर्यंतची रक्कम महावितरणकडे भरण्यात आली आहे. मात्र, या योजनेतील त्रुटीच दूर होत नसल्याने त्याकडे लक्ष देण्याची विनंतीही या वेळी करण्यात आली.
कर्जमुक्ती, वीज उपलब्धता, हमी भाव आदी धोरणात्मक निर्णयावर सत्ताधाऱ्यांनी मोठी मोठी आश्वासने दिली. पण त्याच्या अंमलबजावणीचे काय, असा प्रश्न आम्ही विचारत आहोत. सत्ता मिळेपर्यंत केलेली पोपटपंची आता अंमलबजावणीमध्ये आणावी याचे भान सरकारने विसरू नये म्हणून हे आंदोलन केल्याचे दानवे यांनी सांगितले. केवळ संभाजीनगरच नव्हे तर मराठवाड्यातील सर्व ७६ तालुक्यांत मोर्चा काढण्यात आल्याचा शिवसेनेचा दावा आहे. सोयाबीन आणि कापसाचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकारने फतवे काढले असल्याचा आरोपही दानवे यांनी केला. मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी सरकारला ‘ क्या हुआ तेरा वादा ’ असा प्रश्न विचारला.