अभाविपविरुद्ध आंबेडकरवादी, एसएफआय, युवक काँग्रेस, रायुकाँची महाआघाडी

औरंगाबाद : केंद्र सरकारने आणलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्यासह इतर राष्ट्रीय मुद्यांवरून विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष धुमसताना दिसत आहे. आंबेडकरवादी, डाव्यांची एसएफआय, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, अशा महाआघाडीविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा तो संघर्ष तीव्र झालेला आहे. त्यात आता दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात रविवारी रात्री काही विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची ठिणगी पडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली आईशी घोष ही विद्याथिर्नी ‘डावी’ की ‘उजवी’ यावरूनही समाजमाध्यमांवर बराच खल सुरू झालेला आहे.

औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गुजरातमधील सेन्ट्रल विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनीही केंद्र सरकारने आणलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्यामागील त्रुटी मांडत विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली. तत्पूर्वी सोमवारी सकाळीच विद्यापीठातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधातील काही संघटनांनी एकत्र येत दिल्लीतील हल्ल्याचा निषेध केला. तर, देवगिरी महाविद्यालयात अभाविपकडूनही निषेधाचे आंदोलन करण्यात आले.

औरंगाबाद विद्यापीठात मागील काही दिवसांपासून विद्यार्थी संघटनांमधील आंदोलन चांगलेच धुमसत आहे. अलीकडेच युवक काँग्रेसने विद्यापीठातील पंडित दीनदयाल उपाध्याय कौशल संशोधन केंद्राच्या फलकाला काळे फासले होते. युवक काँग्रेसने हे कृत्य दिल्लीतील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून उचलल्याचे तेव्हा सांगताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची दडपशाही यापुढे चालणार नाही, अशी भूमिका घेत एकप्रकारे केंद्र सरकारविरोधातील रोष व्यक्त केला होता. यानंतर विद्यापीठातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व आंबेडकरवादी संघटना, या आमने-सामने आल्या होत्या. दोन्ही संघटनांचे सुमारे तीनशे कार्यकर्त्यांचा जमाव जमला तेव्हा विद्यापीठात पोलिसांचा मोठा फौजफाटा मागवण्यात आला होता. अभाविपने सुधारित नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ काढलेल्या मार्चला आंबेडकरवादी संघटना, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेससह इतर संघटनांनी कडाडून विरोध दर्शवला होता. अभाविपविरुद्ध इतर सर्व संघटना, असा संघर्ष विद्यापीठात धुमसत असल्याचे चित्र अलीकडे दिसू लागले आहे.

फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार घेऊन विद्यापीठातील विद्यार्थी संघटना एकत्र याव्यात यासाठी गुजरातमधील सेन्ट्रल विद्यापीठात पीएच.डी.चे शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी औरंगाबादेत आले आहेत. त्यांनी सोमवारी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना राष्ट्रीय मुद्दे, केंद्र सरकारची शिक्षणासंबंधीची धोरणे, याबाबत मार्गदर्शन केले. यात मूळचा औरंगाबाद जिल्ह्य़ातील असलेला सुमेध पारधेही होता. सुमेध पारधे हा सध्या गुजरातच्या सेन्ट्रल विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध व योजनांवर पीएच.डी. करत आहे. सुमेध पारधे म्हणाला,की डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार अधिकपणे रुजलेले विद्यापीठ आहे. या विद्यापीठात विविध विद्यार्थी संघटना कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्यामध्ये काही मतभेद आहेत.  विद्यार्थी संघटनांना आम्ही केंद्राच्या विविध धोरणांची माहिती दिली आहे. सध्या दडपशाही सुरू आहे. आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. शिक्षणही महाग होत आहे. त्यामागे महागडे शिक्षण मिळणाऱ्या संस्थांशिवाय आपल्यापुढे पर्याय ठेवायचा नाही, असे धोरण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थेतील फरक समजावून सांगावा, त्यांच्यामध्ये जागृती करावी आणि दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कायम संघर्षांची ठिणगी पेटवत त्याला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असे सुमेध पारधे याने सांगितले. या वेळी सुमेधचे सहकारी तेजल वरखडे आणि सुमेर हे देखील उपस्थित होते.