छत्रपती संभाजीनगर : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी टाकलेल्या छाप्यात ऑनलाइन मटका जुगार उघडकीस आला. चार जणांना पोलिसांनी मटका खेळण्याच्या साहित्यासह शनिवारी रात्री गजाआड केले. या छाप्यातील तरुणांकडे चौकशी केली असता तुळजापूर शहरातील भाजप आणि काँग्रेसचे पदाधिकारी या बुकीचे मालक असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी ३३ जणांवर गुन्हा दाखल केला.

तुळजापूर शहरातील मलबा हाईट्समधील साठे नावाच्या व्यक्तीच्या फ्लॅटमध्ये ऑनलाइन पद्धतीने कल्याण आणि मिलन मटक्याचा खेळ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील एक आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्वतः शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तुळजापूर शहरात छापा टाकला. ज्या फरार आरोपीला पकडण्यासाठी छापा टाकला तिथे तो नव्हता. मात्र, घटनास्थळी डिजिटल मटका खेळ सुरू होता. या छाप्यात रवींद्र बळीराम ढवळे (वय २८, रा. शिवाजीनगर हडको, तुळजापूर), विक्रम दिलीप नाईकवाडी (वय ३१, रा. दीपक चौक, तुळजापूर), विकास बाबुराव दिवटे (वय ३०, रा. घाटशीळ रोड, तुळजापूर) आणि नीलेश आप्पासाहेब तेलंग (वय २९, रा. ढेकरी, ता. तुळजापूर) अशी या चार जणांची नावे आहेत.

पोलिसांनी त्यांच्या भाषेत कसून चौकशी सुरू केल्यानंतर विक्रम नाईकवाडी याने तुळजापूर शहरात सुरू असलेल्या या मोठ्या डिजिटल मटका बुकी चालकांची नावे पोलिसांना सांगितली. नाईकवाडी याने दिलेल्या जबाबानुसार चैतन्य शिंदे (रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर), अमोल माधवराव कुतवळ (रा. रावळ गल्ली, तुळजापूर), सचिन पाटील (रा. रावळ गल्ली, तुळजापूर) आणि विनोद गंगणे (रा. जिजामाता नगर, तुळजापूर) हे चारजण या मटका बुकीचे मालक असल्याचे त्याने कबूल केले. कमिशनवर काम करणारे अनेक एजंट यात सहभागी असल्याचेही समोर आले आहे. यातही अनेकजण भाजप व काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचे सांगण्यात आले.