शिवसैनिकांमध्ये संताप

कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसैनिकांचा रोष अधिक वाढला आहे. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याच्या घटनेवरून त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची भाषा हीन दर्जाची असल्याने सेनेचे कार्यकर्ते वैतागले आहेत. या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव फारसे चर्चेत नाही. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केले असावे, असे सांगण्यात येत आहे.  शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी विशेष प्रयत्न केले होते.

कन्नड मतदारसंघात शिवसेनेने उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादीकडून संतोष कोल्हे रिंगणात आहेत, तर भाजपचे बंडखोर म्हणून किशोर पवार यांनीही उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघातील चुरस वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेली भूमिका अनेक शिवसैनिकांना पटलेली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत तो रोष शिवसैनिक व्यक्त करत होते. त्यात नव्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भर पडणार आहे. हर्षवर्धन जाधव यांनी मिळविलेल्या मतांमुळे एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार झाले. ज्यांच्यामुळे विजय मिळाला, त्यांना मदत व्हावी म्हणून एमआयएमने कन्नड मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही. उदयसिंह राजपूत यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांना चांगली लढत दिली होती. ते आता शिवसेनेत आले असल्याने कन्नड मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरत आहे.