सिद्धी सौरभ दोशी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका गावात पार्वती पटेल नावाची बारा वर्षांची एक मुलगी राहत होती. तिची आई स्वत:साठी भरपूर सौंदर्यप्रसाधनं, लिपस्टिक, ब्लश, नेलपेंट आणि त्वचेला मऊ मुलायम बनवणाऱ्या क्रीम वगैरे वापरायची. ती नेहमी पार्वतीलाही अंगाला क्रीम लावण्यासाठी आग्रह करायची, पण पार्वती मात्र क्रीम लावायला नकार देत असे. कारण पार्वतीचा असा समज झाला होता की, तिनं एकदम तिच्या आईसारखं व्हावं असं तिच्या आईला वाटत होतं. पण पार्वतीला हे काही फारसं आवडत नव्हतं.

एके दिवशी तिची आई खूप हताश झाली आणि म्हणाली, ‘‘अगं, तुझ्या त्वचेला क्रीम लाव म्हणजे तुझी त्वचा मुलायम होईल, हे सांगून सांगून मी आता कंटाळले आहे.’’ आई तिच्यावर जवळजवळ ओरडलीच म्हणून ती त्या छोटय़ा कपाटाच्या दिशेनं गेली- जिथे सर्व सौंदर्यप्रसाधनं आणि क्रीम ठेवले होते. हलक्या हातानं तिनं क्रीमची बाटली काढली आणि झाकण उघडलं तर तिला मोठा धक्काच बसला. बाटलीचं झाकण उघडताच एक आवाज आला- ‘‘जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीत यश हवंअसेल तेव्हा तुम्ही मला लावा आणि पाहा तुम्ही कसे यशस्वी होता ते! मनात इच्छा धरून मला त्वचेवर लावा आणि मनातली इच्छा जोरानं बोलून दाखवा, ती पूर्ण होणारच.’’ तिनं मग ते क्रीम थोडंसं लावलं आणि खूप जोरात म्हणाली, ‘‘मला आज माझ्या आईकडून झुबके हवे आहेत. एरवी मी मागितलं तर ती माझ्यावर खूप रागावते.’’

त्यानंतर काही वेळानं तिच्या आईनं तिला जेवणासाठी जेवणाच्या टेबलावर बोलावलं. ती तिच्या खुर्चीवर बसली असता जेवणाच्या ताटाशेजारी तिला लाल रिबनमध्ये बांधलेले निळ्या रंगाचे सुंदर कागदी वेष्टनात गुंडाळलेली बक्षीसपेटी आणि एक चिठ्ठी मिळाली. प्रथम तिनं चिठ्ठी उघडली आणि ती वाचली, त्यात फक्त एकच ओळ लिहिली होती, ‘‘प्रिय पार्वती, तुझ्यावर रागवल्याबद्दल क्षमस्व.’’ हे वाक्य फुलांनी, हृदयचित्रांनी आणि चांदण्यांनी वेढलेलं होतं. मग तिनं ती पेटी उघडली. त्यामध्ये होती सुंदरशी एक कर्णफुलांची जोडी. मग अचानक तिच्या लक्षात आलं की ही तर त्या क्रीमची जादू आहे. त्यानतंर मग क्रीमची ही जादू वापरून तिला नवीन सायकल, बॅडिमटन सेंट, इतर खेळणी, वगैरे मिळालं.. त्या आनंदात भरपूर अभ्यास करून तिनं यशही मिळवलं आणि भरपूर खेळून शरीर तंदुरुस्त बनवलं.

जसजशी वर्षे उलटत गेली तसतसे तिला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळाल्या. तिचं आयुष्य खूपच झकास चाललं होतं. एके दिवशी तिची ती क्रीमची बाटली रिकामी झाली आणि तिने मनात क्रीमची दुसरी बाटली मिळावी अशी तिची इच्छा धरली आणि दुसऱ्या दिवशी, काय आश्चर्य! तिच्याकडे तशीच दिसणारी क्रीमची नवीन बाटली आली होती.

मधे बरीच वर्षे गेली. आता ती चाळीस वर्षांची झाली होती. तिचं लग्न झालं होतं आणि तिला दोन लहान मुलंही होती. ती भरपूर अभ्यास करून आता आर्किटेक्ट झाली होती. तिच्या पतीचं नाव वरुण आणि मुलांची नावं अभिषेक आणि मृणाल अशी होती.एक दिवस तिला खूप वाईट बातमी मिळाली- तिची आई हे जग सोडून गेल्याची. आईनं मृत्यूपूर्वी तिला लिहिलेली चिठ्ठी मिळाली.

प्रिय पार्वती,

ही चिठ्ठी तुला जादूई क्रीमचं रहस्य सांगेल. जेव्हा तू आपल्या इच्छा बोलून दाखवल्या, तेव्हा मी त्या ऐकल्या. क्रीमच्या बाटलीच्या आत एक स्पीकर आणि मायक्रोफोन होता त्यामुळे मी तुझ्या सर्व इच्छा ऐकल्या आणि त्या त्या पूर्ण केल्या. त्या आनंदात तू कठोर परिश्रम केलेस. जे यश मिळवलं ते सर्व तुझ्या क्षमतेवर आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर होतं. मी तुझा चांगला अभ्यास घेतला आणि नवीन आव्हानांसाठी सज्ज केलं. मला खात्री आहे, हे वाचून तुला आनंदच होईल.

तुझी लाडकी आई अवनी पटेल.

चिठ्ठी वाचून पार्वतीचे डोळे भरून आले. जादूई क्रीम ही तिच्या आईनं केलेली एक युक्ती होती. तिच्या आईनं तिच्या भल्यासाठी काय काय प्रयत्न केले हे आठवून ती पूर्ण दिवस रडली. मग आईच्या आठवणीत ती आयुष्यभर ते क्रीम लावत राहिली आणि क्रीमच्या बाटलीतल्या तिच्या आवाजातलं रेकॉर्डिंग ऐकत राहिली.
तात्पर्य – आपले पालक कधीही चुकीचं करत नाहीत आणि आपल्या भल्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करत असतात.
इयत्ता- सहावी
म मॅकहेनरी इंग्लिश स्कूल, पुणे</p>

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balmailfal article about mother moral story amy