रेणू दांडेकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाची थोडीशी रिपरिप सुरू झाली अनम्् घरात लहानसे रंगीत किडे दिसू लागले की त्यांना पाहून आजी पावसाचा अंदाज बांधू लागे, ‘‘चला, आता पावसाला चांगली सुरुवात होईल.’’ आजीच्या या अंदाजाविषयी जाई आणि महेशला नेहमी आश्चर्य वाटे. न राहवून त्यांनी आजीला आज विचारलंच, ‘‘आजी, तुला कसं कळतं ग पावसाविषयी?’’

आजीच्या गप्पा म्हणजे या लेकरांसाठी जणू जुन्या आठवणींचा खजिनाच. आजी सांगू लागली, ‘‘अरे मुलांनो, जून महिना म्हणजे शाळा आणि पावसाळा एकदमच सुरू होतात. सध्या टी. व्ही. किंवा गूगलवर संपूर्ण देशाचा नकाशा दिसतो आणि पाऊस कुठे आहे, केव्हा येणार हेही तुम्हाला समजतं. पण पूर्वी हे तंत्रज्ञान नव्हतं तरीही शेतकऱ्यांना पावसाची बातमी मिळायची आणि आजही मिळते.

‘‘आजी, कोण सांगतं त्यांना? कोण देतं पावसाची खबर? महेशची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.

‘‘अरे थांब. सांगत सांगते.. याचं उत्तर आहे निसर्ग. निसर्गातले विविध कीटक, पक्षी, प्राणी पाऊस कधी येणार, किती पडणार याची वर्दी देतात बरं का! मी तुम्हाला माझ्या लहानपणची गोष्ट सांगते. एकदा मी अशीच एका लहानशा गावात गेले होते. तिथे भेटले एक शेतकरी काका. शाळा नुकतीच सुरू होणार होती. ‘काका, पाऊस येईल आता’ असं मी त्यांना सहज म्हणाले.’’

‘‘ठावं हाय मला. मिरग दिसाया लागलाय न्हवं का?’’ असं ते पटकन बोलून गेले. मला कळेना मिरग कोण? कुठे दिसतोय? त्यांनी एक सुंदर लाल मखमली किडा हातावर घेतला नि म्हणाले, ‘‘ मिरग..’’ मृग नक्षत्रात दिसणारा हा किडा मला चित्रात माहीत होता, पण प्रत्यक्ष पाहिला नव्हता. इतका मऊमऊ आणि सुंदर होता तो!

काका सांगू लागले, ‘‘पावसाची पहिली सर येते नि हा जमिनीतून बाहेर येतो. हा दिसला की पेरणीला सुरुवात करतो आमी! याला जसं आमी ‘गोसावी’ म्हणतो किंवा ‘मिरग’ म्हणतो. तसं कुठं कुठं काय काय म्हनत्यात.’’

मला नंतर कळलं, याला भारतभर वेगवेगळी नावं आहेत. जसे – राणी किडा, बिभोती, गोसावी नि याला इंग्रजीत म्हणतात Red velvet mife.

‘‘ मुलांनो, तुम्ही पावशा पक्षी बघितलाय कधी? हाही सांगतो पाऊस आला, पाऊस आला.. पेरते व्हा पेरते व्हा.. कधी एकदा या पक्ष्याचा आवाज कानावर पडतोय असं शेतकऱ्याला होतं. शेतकरी या पक्ष्याची आतुरतेनं वाट पाहत असतो. मळभ किंवा ढगाळ वातावरणात जसा हा पक्षी ओरडतो तसा रात्रीही ओरडतो. नर-मादी दोघंही सारखेच दिसतात, पण मादीचा आवाज जास्त कर्कश असतो. एका पट्टीत तो ओरडत राहतो. गंमत म्हणजे, कोकिळा जशी आपली अंडी दुसऱ्याच्या घरटय़ात घालते, तशी ही पक्षीण दुसऱ्याच्या घरटय़ात अंडी घालते.. पावसाची बातमी देणारा हा पक्षी शतेकऱ्याला खूप मदत करतो.’’ मुलांना ही माहिती ऐकून फारच नवल वाटत होतं.

आजी पुढे म्हणाली, ‘‘आपण कधी कधी कुणाची तरी  उत्सुकतेनं, अधीरपणे वाट पाहत असतो. आणि म्हणतो, ‘चातकासारखी तुझी वाट पाहतोय.’ चातक हाही पक्षी पावसाची नांदी देणारा, पाऊस आल्याचं सांगणारा.. अर्थात पाऊस आल्याचं सांगणारा हा पक्षी असंच त्याला म्हटलं जातं. चोच उघडून फक्त पावसाचं पाणी पितो. पावसाच्या पहिल्या थेंबाचा तो लाभार्थी आहे. पावसाळा हा ऋतू त्याला इतका आवडतो की आपल्या मधुर आवाजात ‘पियू पियू’ असं तो ओरडू लागतो. या पक्ष्याविषयी खूप वेगवेगळी माहिती गावातले लोक देतात. पाण्यात टाकले तरी हा पक्षी ते पाणी पीत नाही, कारण तो पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहत असतो म्हणे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत चातक पक्ष्याचा दृष्टांत बरेच ठिकाणी दिलाय.

पाऊस आला की ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ हे गाणं ठरलेलं! मोर रंगीबेरंगी सुंदर पिसारा फुलवतो नि पाऊस येणार म्हणून नाचायला लागतो. वर्षां ऋतूत मोर आपला पिसारा फुलवतो आणि इतका नाचतो की त्याची काही पिसे तुटतातही.’’ मोराची ही गंमत ऐकून महेश आणि जाई मोरासारखे नाचायलाच लागले.

‘‘पाऊस यायचा सुमार झाला की ढग भरून येतात, अंधारून येतं. पावसाळा सुरू होतो आणि अनेक प्राणी, पक्षी व कीटक यांच्या प्रजननाची सुरुवात होते. म्हणजे काय? तर पक्षिणी अंडी घालतात, कीटक अंडी घालतात,  नर आणि मादी एकमेकांना आकर्षित करण्यासाठी ओरडतात. आपण असं म्हणतो, यांना पाऊस आल्याचं कळतं. म्हणून तर एरवी आपण ‘बेडूक उडय़ा मारतो’ किंवा ‘डराव डराव, का ओरडता उगाच राव’ अशी गाणीही म्हणतो. तर पावसाळा आला की नर बेडकांना मादी बेडकांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यायचं असतं. ते कर्कश ओरडतात तेव्हा आपल्यासाठीही ही पाऊस आल्याची सूचना असते. प्रत्यक्ष पाऊस सुरू झाल्यावर गांडूळ, गोगलगाय, साप दिसू लागतात.

खेडय़ात तर अनेक ठिकाणी विहिरीतील पाण्याचा रंग बदलतो, असंही जुनी माणसं सांगतात. पावसाचं नक्षत्र म्हैस, कोल्हा, बेडूक असतं तेव्हा पाऊस खूप पडतो अशी लोकांची धारणा आहे. हे किडे, प्राणी, पक्षी जेव्हा पावसाची सूचना देतात तेव्हा पाऊस येतोही आणि हे दिसेनासेही होतात. कदाचित तेव्हा पाऊस पडतही नाही. माणसं चैत्र पाडव्याला बियाणं पेरतात आणि पावसात मग हे बियाणं जमिनीतून रुजून येतं.

पाऊस येतो नि आपली शाळाही सुरू होते. कदाचित प्राणी- पक्षीही म्हणत असतील मुलांची नवी दप्तर, वह्य, पुस्तकांच्या खरेदीला सुरुवात झाली म्हणजे शाळा सुरू होणार, शाळा म्हणजे जून महिना म्हणजे पाऊसही पडणार. तसंही तुम्ही मुलांनी ‘ये रे ये रे पावसा’ असं म्हणून पावसाला बोलावलेलंच असतं. जसं आपण गूगलवर सर्च करतो की पाऊस कधी येणार ते, हवामानाचा अंदाज पाहतो तसं निसर्गातही पाहू या की निसर्ग ही घटना कशी आपल्यापर्यंत आणतो ते!

मग शोध घेऊ या आता त्या वेलवेटसारख्या मऊ लाल किडय़ाचा, पावशाच्या ओरडण्याचा, चातकाच्या आवाजाचा! बेडकांचं डराव डराव ऐकू या, नि पिसारा फुलवलेला मोरही पाहू या. यांच्या आनंदात आपणही सहभागी होऊ.’’

मुलं आजीच्या निसर्गगोष्टी ऐकण्यात दंग झाली होती. त्यांची समाधी भंग झाली ती महेशच्या हातावर उडत आलेल्या मृगाच्या किडय़ानं. पण महेश या किडय़ाला घाबरला नाही, त्यानं अलगद त्याला बाल्कनीच्या कठडय़ावर ठेवलं आणि ते दोघे बराच वेळ त्याच्याकडे पाहात राहिले. renudandekar@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interesting story for kids in marathi funny story for kids in marathi moral story for kids in marathi zws