तर पत्रास कारण की.. या दिवसांत मी चिक्कार नवनवी ठिकाणं पाहिलीत. तिथल्या माणसांनी घडवलेल्या अनेक वास्तू, वस्तू, उत्सव, खेळ, मंदिरं, घरं, कपडे, बाजार, पदार्थ पाहिलेत. या सर्व तुला दाखवायच्यात म्हणून माझ्या डायरीत चित्रंही काढून ठेवलीत. त्यामुळे ‘चित्रास कारण की..’ असं म्हणणं जास्त बरोबर वाटतंय. तर प्रत्येक प्रवासात खर्चाला तमुक देशाच्या नोटा बदलून अमुक देशाच्या नोटा मागायचो. असं करता करता माझ्याकडे ठिकठिकाणच्या भलत्याच नोटा जमा झाल्या. त्या इतक्या वेगळया होत्या की, त्या खर्चायचं विसरून त्यावरची चित्रं पाहतच राहिलो. कुठलीच नोट मला खर्चावी असं वाटलं नाही. सर्वात छोटी नोट असो वा मोठी, ती मस्त चित्रं रंगांनी नटवलेली होती. कुठल्याच देशाच्या सरकारनं चित्रात कंजुषी आणि रंगाच्या मापात पाप केलं नव्हतं. उदाहरणार्थ, आपला रुपया हा अमेरिकन डॉलरच्या तुलनेत चिक्कार रसातळाला गेला असला तरी नोट किंवा नाणं एकदम खणखणीत. पैसा काळा किंवा गोरा असला तरी नोटा रंगीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्र, रंग, कागदाचे आकार, वजन वेगळं असलं तरी कुठल्याच देशानं पांढरा कागद आणि काळया पेननं हातानं आकडा लिहून अरसिकपणा दाखवला नव्हता. उलट नोटा आणि नाणी पाहून प्रत्येक देश किती कला संस्कृती जपणारा असेल असाच भास होत राहिला. माझ्याकडे असलेल्या कुठल्याच देशातल्या नोटांवर क्षेपणास्त्रं, रणगाडे, अणुबॉम्ब असं हिंसक काहीही दाखवलं नव्हतं. बहुधा कुठल्याच देशाला व्यापार करताना ती ओळख आवडत नसावी. असो. हे सर्व त्या त्या देशाचे चित्रकार करत असणार. म्हणजे प्रत्येक देशाचे चित्रकार असणार. चित्रकला शिकवणारी कॉलेजं असणार आणि शाळेतही चित्रकला शिकवत असणार. तुला काय वाटतं? तर मी मला आवडलेल्या नोटांवरचे काही भाग तुला पाठवत आहे. काहींची चित्रं काढून पाठवतो. तू ते जपून ठेव. या प्रत्येक नोटेत फरक म्हणजे व्यक्तीचित्र, रंग, कागदाचा दर्जा आणि आकार. पण शक्यतो सर्व आडव्या कागदावर आडव्या चित्रांच्या होत्या. एक-दोन उभ्या चित्र काढलेल्या नोटाही होत्या. हे सर्व पाहताना मला आठवलं की, आजवर माझ्या देशातल्या नोटा मी नीट पहिल्याच नाहीत रे. जुन्या, फाटक्या, बंद झालेल्या, नव्या आलेल्या.. त्यावर कितीसारी चित्रं होती. प्रत्येक चित्र काही सांगू पाहात होतं आणि रोज वापरूनही मी तर घाऊक दुर्लक्ष केलं. तू तरी तुझ्या देशातल्या नोटा नीट पाहिल्यास ना? पाचशे रुपयांच्या मागे कुठलं चित्र आहे, हे मला आज आठवतही नाही. देशी स्वस्त नाणी त्यावरचं चित्र, आकार तर मी नीट पहिलाच नाही. असो. यापुढे मी नोटा, त्यावरची डिझाइन, चित्र, रंग अगदी नीट निरखून पाहणार आहे. हे बघ तुझ्याशी बोलता लिहिता एक गंमत म्हणून आठवलं.. आजवर पाहिलेल्या या सर्वात एकही नोट त्रिकोणी, लंबगोलाकार अशी आढळली नाही. तुझ्या पाहण्यात आली का?

पत्र थांबवताना मला सांगावंसं वाटतं की तू स्वत:ची अशी एक लाख रुपयांची (१,०००००) वेगळी नोट कर. मला ती ईमेल कर. मग मी त्या रंगीत प्रिंट करून भरपूर छापून घेतो आणि श्रीमंत होत आणखी ठिकाणे फिरतो. कशी काय आयडिया?

तुझा खासमखास मित्र,

-श्रीबा
shriba29@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story for kids currency of various countries culture and drawings on notes dvr