‘अवनी, लवकर तयार हो. खाली मुलं हाका मारून दमली बघ.’ आईचा आवाज ऐकून अवनीनं झटपट तोंड, हातपाय धुतले आणि ती खाली पळाली. मित्र-मैत्रिणी तिची वाटच पाहात होते. दिवाळीचा किल्ला करायचा होता. सगळे मिळून त्याचीच तयारी करणार होते. किल्ला कसा करायचा ते ठरलं. मग दगड-विटा, माती असं किल्ल्याचं सगळं सामान गोळा झालं. पण संध्याकाळ होऊन गेली आणि मुलांना घरून हाका येऊ लागल्या. त्यामुळं सगळ्यांना घरी पळावंच लागलं.
अवनीची आई पणत्या तयार करत होती. चमचमत्या टिकल्या, रंगीत मणी यांनी सजवलेल्या त्या पणत्या खूप छान दिसत होत्या. ‘दिवाळी आली, किती मज्जा नं’ असं म्हणत अवनी आईला मदत करू लागली.
एक सुंदरसा रंगीत मणी घेऊन त्यातून ती हळूच खिडकीकडे पाहू लागली. तिला नवल वाटलं, त्या खिडकीत कुणीतरी उभं होतं, पण मणी बाजूला केला की मात्र कोणी दिसत नव्हतं. ती हळूच मणी डोळ्यांसमोर धरून खिडकीजवळ गेली. तिला खिडकीतून आवाज आला, ‘अवनी, बाहेर येतेस थोडा वेळ, तुमच्या दारात. अवनी हळूच बाहेर गेली. तिथं आईनं छान कुंडय़ा लावलेल्या होत्या. गुलाबाच्या टपोऱ्या फुलाजवळ हळूच ती डोकावत होती- चमचमती, सोनेरी-चंदेरी.. खूप सारे दिवे उजळवल्यावर पडणारा प्रकाश समोर पसरला होता. अवनी पाहातच राहिली तिच्याकडे.. तिनं विचारलं, ‘तू परी आहेस की कुठली राणी?’ समोरून गोड हसण्याचा आवाज आला. ‘अगं मी सणांची राणी- दिवाळी. ओळखलं नाहीस मला?’ अवनीला नवल वाटलं. दिवाळी आपल्याशी बोलतेय? ती हळूच िभतीला टेकून बसली, तशी दिवाळीराणीही तिच्या शेजारी येऊन बसली.
‘अवनी, दिवाळीत तुम्ही खूप मजा करता, हो ना?’ दिवाळीराणीच्या या प्रश्नावर अवनी आनंदाने सांगू लागली, ‘हो तर. नवीन कपडे, पणत्या, कंदील आणि किल्ला.. पहाटेच्या अभ्यंग स्नानाची तर खूप गंमत येते. आणि मी छान रांगोळी काढणार आहे दारात.. तिनं दिवाळीला बागेत नेऊन किल्लाही दाखवला. दिवाळीनं तिला शाबासकी दिली. ‘अवनी, तुम्ही किती छान तयारी केलीत गं माझ्या स्वागताची. मला आनंद झालाय, पण मी थोडी दु:खी आहे गं.’
‘का गं काय झालं,’ अवनीला गंमतच वाटली. सणांची राणी दिवाळी दु:खी?
दिवाळीराणी म्हणाली, ‘अवनी, बघ नं पावसाळ्यानंतर शेतात छानशी पिकं येतात. सुगीचे दिवस असतात. थोडा वेळ कष्ट बाजूला सारून सगळ्यांनी एकत्र यावं, आनंद साजरा करावा म्हणून माझी सुरुवात झाली. आता वर्षांतला सर्वात मोठा सण म्हणून सर्वत्र साजरी होते दिवाळी. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा असं प्रत्येक दिवसाला आगळं महत्त्व मिळालं. भाऊबीजेसारखा गोड दिवस आला.’
‘हो तर, दिवाळीचा नुसता जल्लोष असतो बघ. ‘माझा आवडता सण’ असा निबंध असला की मी दिवाळीच लिहिते. दिवाळीराणी, तू खूप खूप आवडतेस मला.’ अवनी हरखून म्हणाली.
‘पण तरी तू दु:खी का गं?’ बोलत बोलत त्या दोघी परत घराजवळ आल्या.
दिवाळी म्हणाली, ‘फटाके. त्यांचा त्रास होतो गं मला. क्षणभर मजा वाटते तुम्हाला फटाके उडवताना, पण त्यामुळे ध्वनिप्रदूषण आणि हवेचंही प्रदूषण होतं. शिवाय अपघातही होतात नं?’
अवनीला काल तिने बाबांकडे फटाक्यांसाठी केलेला हट्ट आठवला. बाबांनी फटाके आणायचे नाहीत असं ठरवलं होतं. पण अवनीला फटाके हवेच होते. ती गप्पच बसली जरा वेळ. मग हळूच म्हणाली, ‘पण दिवाळीराणी, आम्ही वर्षांतून एकदाच तर फटाके वाजवतो.’
‘अवनी, खरंय तुझं, पण तुझ्या गावात, राज्यात आणि देशात या चार-पाच दिवसांत किती लोक फटाके वाजवतात माहीतेय? त्यामुळे सगळीकडेच आवाजाचं प्रदूषण वाढतं. तुम्हा माणसांना गंमत वाटते; पण पशू-पक्ष्यांना याचा खूप त्रास होतो. कितीतरी चिमणे पक्षी घाबरून जातात. शिवाय लहान मुलं, वृद्ध माणसं यांना त्रास होतोच की.’ दिवाळीचं बोलणं अवनी नीट ऐकत होती. ‘हो हे मात्र खरंय, माझा छोटा भाऊ जाम घाबरतो फटाक्यांच्या आवाजाला. पण मग मी फक्त शोभेचे फटाके लावू का? त्यांचा आवाज होत नाही.’
अवनीच्या बोलण्यावर दिवाळीराणी म्हणाली, ‘अवनी, त्यांचा धूर पाहिलास नं? अगं त्या धुराने सगळा परिसर भरून जातो. आधीच कारखान्यांमुळे, वाहनांमुळे हवा प्रदूषित झालीय. त्यात या धुराची भर पडते.’
‘मग फटाके वाजवायचे नाहीत दिवाळीराणी?’ अवनी हिरमुसून म्हणाली.
‘हं, मला तरी तसं वाटतं. दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. सगळ्या नातेवाईकांना भेटावं, एकत्र येऊन छान फराळ करावा. पणत्या, आकाशकंदील लावून प्रकाशाने घरअंगण उजळून टाकावं. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण असतो. धुराचा आणि आवाजाचा नाही. हो ना अवनी?’
‘दिवाळीराणी, मला पटलं तुझं बोलणं. मी आता फटाके वाजवणार नाही. माझ्या मित्र-मैत्रिणींनाही सांगेन.’ अवनी म्हणाली.
‘अगदी खरं! आता तू खूश होशील नं? अवनीनं उडय़ा मारत विचारलं. ‘नक्कीच, तुझ्याप्रमाणेच सगळ्यांनीच हे मनावर घेतलं तर फटाक्यांमुळे होणारे दुष्पपरिणाम कमी होतील आणि आपल्या सगळ्यांचाच आनंद वाढेल. चल आता मी निघते, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा’ म्हणत दिवाळीराणी अदृष्य झाली.
‘अवनीऽऽ तो गुलाबी खडा आण इकडे या पणतीवर लावायचाय..’ आईची हाक आली. ‘वॉव्ह! आई गं, दिवाळीराणी बोलली माझ्याशी’ म्हणत अवनी घरात पळाली.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Nov 2013 रोजी प्रकाशित
दिवाळी राणी खूश झाली…
‘अवनी, लवकर तयार हो. खाली मुलं हाका मारून दमली बघ.’ आईचा आवाज ऐकून अवनीनं झटपट तोंड, हातपाय धुतले आणि ती खाली पळाली. मित्र-मैत्रिणी तिची वाटच पाहात होते.
First published on: 03-11-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of diwali