समीक्षकांनी वाखाणलेल्या आणि प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिलेल्या “पुनःश्च हनिमून” या नाटकानंतर लेखक संदेश कुलकर्णी यांचे “असेन मी, नसेन मी” हे नवे कौटुंबिक, भावनाप्रधान नाटक रंगभूमीवर आलेले आहे. आपापल्या आयुष्यातील एकाकीपणाला सामोरे जाणाऱ्या मुख्यतः तीन सुखवस्तू (अन एक नाहीरे वर्गातील) स्त्रियांची ही कथा आहे. आपलं घर उभं करण्यासाठी आणि कुटुंब सांभाळण्यासाठी या स्त्रियांनी केलेले कष्ट, त्याग अन तडजोडी, त्या त्या वेळच्या त्यांच्या वागण्याचे त्यांच्या आप्तस्वकीयांनी लावलेले अर्थ, त्यामुळे नातेसंबंधात निर्माण झालेले ताणतणाव आणि कटुता, कुटुंबातील हरवलेला संवाद… या सगळ्या आजच्या काळात, आपल्या सगळ्यांच्या घरात, शेजारी आणि समाजात आढळून येणाऱ्या स्थितीवर हे नाटक नेमकं बोट ठेवतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे नाटक वास्तववादी असून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब त्यात आहे. या नाटकात घडणारी प्रत्येक घटना, संवाद आणि नाटकातील प्रत्येक पात्राला आपण आपल्या कुटुंबातील, शेजारीपाजारील किंवा नात्यातील व्यक्तीशी, घटनांशी आणि (व्यक्त अव्यक्त) संवादांशी रिलेट करू शकतो.

हेही वाचा – ज्याची त्याची लव्ह स्टोरी!

एकाकीपण कुणालाच नको असतं. तरीही ते येतं. एखाद्याला आपल्या तुसड्या वृत्तीमुळे, एखाद्याला आपला स्वच्छंदीपणा जपण्याच्या कैफात इतरांकडे दुर्लक्ष केल्यामुळे, एखाद्याला आपली माणसं नको तितकी आपल्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न केल्यामुळे, एखाद्याच्या आयुष्यातील प्राथमिकतांमध्ये गल्लत केल्यामुळे… अशा अनेक कारणांनी, बऱ्याचदा आयुष्याच्या संध्याकाळी तर कधी क्वचित माध्यान्ही सुद्धा एकाकीपणाचा, तुटलेपणाचा सामना करावा लागतो. वाट्याला आलेल्या किंवा स्वतःहून ओढवून घेतलेल्या तुटलेपणाला आणि एकाकीपणाला आपण कुढत कुढत सोसतो, त्याला धीराने सामोरं जातो की त्या एकाकीपणातही आपले आनंदाचे क्षण वेचतो यावरच आपल्या उर्वरित आयुष्याचा उत्सव होणार की माती हे ठरत असतं.

हेह वाचा – आबा अत्यवस्थ आहेत!

दुःखाचं दळण दळत बसण्यापेक्षा त्या दुःखाचा फुगा फोडायचा हे तत्वज्ञान असलेली छोट्या गोष्टींत आनंद शोधणारी वर्षा (शुभांगी गोखले). आपल्या पतीच्या पश्चात कुटुंब व मुलांची जबाबदारी एकटीने पार पाडणारी आणि त्यामुळे, म्हातारपणी स्मृतीभंशाचा त्रास होऊ लागल्या नंतरही देखील, आपल्याला कुणाच्या मदतीची गरज नाही असं म्हणणं असणारी खंबीर दीपा (नीना कुळकर्णी). वर्कोहोलिक आणि आपल्या कामात परफेक्शनिस्ट असणारी, आपल्या हाताखालील लोकांनीही आपल्या सारखेच असावे या अट्टाहासामुळे एक खडूस आणि नावडती बॉस झालेली, लहानपणी कुटुंबात कळत नकळत आपल्यावर झालेल्या अन्यायाचे शल्य काळजात बाळगूनही आपल्या आईची मायेने काळजी घेणारी गौरी (अमृता सुभाष). या तीनही मुख्य पात्रांच्या मनात एकमेकींबद्दल काही हळवे अन काही दुखरे कोपरे आहेत आणि या दोन्ही टोकांच्या भावना त्या त्या पात्रांच्या आपापसातील संभाषणातून कुठल्याही मेलोड्रामाचा वापर न करता, या गंभीर विषयावर नेमकं आणि नैसर्गिकरित्या मांडण्यात लेखक संदेश कुलकर्णी आणि प्रथमच व्यावसायिक नाटकाचं दिग्दर्शन करणारी अमृता सुभाष यशस्वी ठरले आहेत.

हेही वाचा – तोडी मिल फॅन्टसी

एखादी उत्तम नाट्यसंहिता तितक्याच ताकदीच्या कलाकारांच्या हाती आली की तिचं कसं सोनं होतं याचं हे नाटक उत्तम उदाहरण आहे. तिन्ही अभिनेत्रींनी आपापल्या लौकिकाला जागेल अशा परिपक्व अभिनयाचे दर्शन या नाटकात घडवले आहे. नेपथ्य, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना, वेशभूषा अशी सर्व तांत्रिक अंगे देखील एकंदर नाटकाच्या दर्जाला साजेशी झाली आहेत.

“अवघा भवतालच भरडला जातोय काळाच्या जात्यात, उद्याच्या सुपात कदाचित असेन मी, नसेन मी” हे जाणवून, नाटक सुरु असताना आणि नाटकाच्या शेवटी डोळे पुसणारे प्रेक्षक ही, नाटक योग्य प्रकारे योग्य जागी पोहोचल्याची पावतीच आहे.

चुकवू नये असे नाटक. जरूर पाहा.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi natak asen me nasen me review by saby parera hrc