नव्वदच्या दशकात मुंबईतील गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपानंतर गिरण्या बंद झाल्या आणि गिरणी-कामगार त्यांच्या कुटुंबासकट देशोधडीला लागले. कालांतराने बंद झालेल्या गिरण्यांच्या जागी मॉल आणि भव्य रहिवासी इमारती आल्या. तिथला मूळनिवासी असलेला गिरणी कामगार आजूबाजूला बैठ्या चाळी नावाच्या आडव्या झोपडपट्टीत किंवा एसआरएच्या नावाच्या उभ्या झोपडपट्टीत ढकलला गेला. या गिरणी कामगारांची वंशज असलेली आजची तरुण पिढी आलिशान लाइफस्टाइलची स्वप्ने बघत, जिथे त्यांच्या पूर्वजांनी नोकरी केली त्याच जागेवर झालेल्या मॉल्समध्ये चतुर्थ श्रेणीची कामं करू लागली. या आजच्या पिढीचा प्रतिनिधी असेलला घंट्या पावशे हा तरुण, तोडी मिल सोशल नावाच्या रेस्टो-बारमध्ये सफाई कामगाराची नोकरी करता करता आपल्या मित्रांसोबत स्वतःचा स्टार्टप सुरु करून आपल्या झोपड्पट्टीलाच आपल्या स्टार्टपचं साधन बनवून उच्चवर्गीयांच्या स्टेटसपर्यंत पोहोचण्याची फॅन्टसी रंगवतो. पण त्या फॅन्टसीत देखील तो आपलं ध्येय गाठण्यात अपयशी ठरतो…

यापूर्वी मराठी रंगभूमीवर आलेल्या, गिरणी कामगारांची व्यथा-वेदना मांडणाऱ्या “अधांतर” आणि “कॉटन 52 पॉलिस्टर 85” यासारख्या नाटकांनी हाताळलेल्या विषयांचं आणि त्या नाटकाची विषयवस्तू असलेल्या गिरणी कामगारांच्या पुढील पिढीचं काय झालं असेल? काय होत असेल? या सत्याचा, तसेच त्यांचं काय होऊ शकेल? या शक्यतांचा वेध घेणाऱ्या ‘तोडी मिल फॅन्टसी’ या नाटकाची ही कथा आहे.

हेही वाचा : प्रशांत दामलेंनी उलगडलं ६३ चं कोडं! ‘गेला माधव कुणीकडे’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!|

वरवर पाहता, विषय जरी मुंबईच्या गिरणी कामगारांचा असला, त्यांच्या आत खोल दडलेल्या वेदनेचा असला तरी जगाच्या पाठीवर कुठेही, पारंपरिक व्यवसाय बंद पडल्यामुळे, नवीन प्रकल्पासाठी विस्थापित व्हावे लागल्यामुळे किंवा एकंदरीतच बदलत्या काळाशी जुळवून घेता न आल्यामुळे अडगळीत पडलेल्या आणि त्यामुळे फरफट होत असलेल्या समस्त समाज घटकांची ही वेदना आहे.

नाटकाचा विषय अतिशय गंभीर असला आणि मराठी नाटकाच्या प्रेक्षकांसाठी तो नवीन नसला तरी अत्यंत फ्रेश, विविध फॉर्म्सची मोडतोड करून केलेलं फ्युजन सादरीकरण हा या नाटकाचा USP आहे. या नाटकाची त्याची मांडणी अतिशय प्रवाही, उपरोधिक, खुसखुशीत आणि आजच्या पिढीला रिलेट करता येईल अशा संगीताचा पुरेपूर वापर करून करण्यात आली आहे. गोष्ट पुढे नेण्यासाठी अनेक ठिकाणी गाण्यांचा वापर करण्यात आला आहे. विविध प्रकारच्या म्युझिक फॉर्म्सचा वापर केलेला आहे. स्टँडअप, स्किट्स, रॅप शो, पॉप शो, लाईव्ह बँड अशा आधुनिक प्रकाराला सरावलेल्या नवीन पिढीला आपलं वाटेल असं या नाटकाचं सादरीकरण आहे.

हेही वाचा : नाट्यरंग : आज्जीबाई जोरात – नव्या पिढीचं आधुनिक बालनाट्य…

एकाचवेळी काळजाला टोचणारा विषय, कानाला सुखावणारं संगीत, नेत्रसुखद सेट आणि व्हिज्युअल्स, व खुसखुशीत संवाद यामुळे अंकुश चौधरी प्रोड्यूसर आणि प्रेजेंटर असलेलं, थिएटर फ्लेमिंगो या संस्थेने शो डिझाईन केलेलं, सुजय जाधव लिखित, विनायक कोळवनकर दिग्दर्शित हे नाटक, गंभीर विषय नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी नाट्यकर्मींना काय करता येईल यापैकी एक मार्ग सोदाहरण आपल्यासमोर डंके कि चोट पे सादर करतात.

Story img Loader