स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी महिला नगरसेविका आक्रमक

मुंबईचा महापौर कुणाचा होणार, हा प्रश्न अद्याप अधांतरी असतानाच, सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेत आतापासूनच स्थायी समितीसाठी वाद सुरू झाला आहे. तब्बल ३७ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हाती असणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा नगरसेवकाऐवजी नगरसेविकेवर सोपवावी, यासाठी सेनेच्या महिला नगरसेविका आक्रमक झाल्या आहेत. पालिकेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक यशवंत जाधव यांची नियुक्ती झाल्यामुळे आता स्थायी समिती अध्यक्षपदी नेतृत्व करण्याची संधी महिलेला मिळावी, अशी या नगरसेविकांची मागणी आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर पालिका सभागृहात नगरसेविकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पालिकेतील महत्त्वाच्या पदांवर नगरसेविकांनाही प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून नगरसेविकांकडून करण्यात येऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील विधानसभा निवडणुकीनंतर पालिकेतील सभागृह नेतेपदी तृष्णा विश्वासराव यंची नियुक्ती करून सभागृहाचे नेतृत्व करण्याची संधी नगरसेविकेला दिली होती.

पालिका निवडणुकीनंतर शिवसेना पालिकेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गटनेतेपदी शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक यशवंत जाधव यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता एखाद्या ज्येष्ठ नगरसेविकेची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी नगरसेविका करत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शुभदा गुडेकर, राजुल पटेल, साधना माने, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर आदी ज्येष्ठ महिला निवडून आल्या आहेत. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदी यापैकी एखाद्या नगरसेविकेची नियुक्ती करावी, अशी चर्चा नगरसेविकांमध्ये सुरू झाली आहे.

महापौरपदाच्या सोडतीनुसार या वेळी मुंबईच्या महापौरपदी खुल्या गटातील व्यक्तीची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविकेची नियुक्ती करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.