विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षांचे तिकीट कापून तिकीट वाटपात रोखठोक धोरण ठेवणाऱ्या भाजपच्या असंतुष्टांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाऱ्या खेचण्यात यश मिळविल्याने सर्वच पक्षांत पक्षनिष्ठेच्या ठिकऱ्या उडाल्याचे चित्र पुढे आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांनी तलवारी म्यान केल्या. परंतु पक्षीय उमेदवारांच्या उपस्थितीने सर्वच प्रभागांत बहुरंगी लढती होणार आहेत. वर्धा जिल्हा परिषदेच्या ५२ पैकी ५० जागांसाठी २९० तर पंचायत समितीच्या १०० जागांसाठी ५२९ उमेदवार रिंगणात आहेत. दोन प्रभागांबाबत निवाडा प्रलंबित आहे. जिल्हा परिषदेच्या ४७ व पं. स.च्या ६४ उमेदवारांनी माघार घेतली. वर्धा, देवळी, समुद्रपूर, हिंगणघाट, आर्वी, आष्टी व कारंजा या आठही तालुक्यांतील जवळपास प्रत्येक मोठय़ा गावातून उमेदवारी आली असल्याने गावनिहाय प्रचाराचा धुरळा उडण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हा परिषदेच्या विद्यमान सत्ताधारी असणाऱ्या भाजपने या वेळी बडय़ा नेत्यांच्या आग्रहास भीक न घालता स्वतंत्र कसोटीवर उमेदवार निवडले. याच रस्सीखेचीत विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष चित्रा रणनवरे यांचे तिकीट कापले गेले. गत वेळी त्या हिंगणी राखीव प्रभागातून तर त्यांचे पती राणा रणनवरे येळाकेळी प्रभागातून निवडून आले होते. मात्र हिंगणी प्रभाग खुला झाल्याने त्या ठिकाणी रणनवरे यांनी तिकीट मागितले. पण राखीव झालेल्या येळाकेळी प्रभागातून त्यांच्या पत्नीला तिकीट देण्याचे पक्षाने नाकारले.

तत्कालीन जि. प. अध्यक्ष विजय जयस्वाल यांना पराभूत करणाऱ्या रणनवरे विरोधात आता परत काँग्रेसतर्फे  जयस्वालच लढत देणार असून सर्वच दृष्टीने ही लढत जिल्ह्य़ात प्रथम क्रमांकाची ठरली आहे. भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनिता ईथापे यांनी पक्षातर्फे तिकीट मिळण्याची खात्री नसल्याचे दिसून आल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रिंगणात उडी घेतली. दोन वेळा जि.प. सदस्य राहिलेले दत्ता मेघेंचे अनुयायी संजय शिंदे मेघेंचा शब्द न चालल्याने शेवटी काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात आले. भाजपच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस राजेश ठाकरे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लहान आर्वीतून उभे झाले. राकाँचे शंकर नागपुरे यांना भाजपचे तिकीट पक्के झाले होते, पण संघनिष्ठ उमेदवार पुढे आल्यावर नागपुरेंना राष्ट्रवादी काँग्रेसने परत पावन करून घेतले. काँग्रेसच्या तिकिटासाठी प्रयत्नशील राजेंद्र चौधरी व प्रवीण चौधरी या सख्ख्या भावांपैकी राजेंद्रला उमेदवारी मिळाल्याने दुसऱ्याने अपक्ष म्हणून भावाविरोधात शड्डू ठोकले. दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपत आलेले माजी जि.प. उपाध्यक्ष अरुण उरकांदे यांच्यावर अपक्ष उभे राहण्याची आपत्ती आहे. आपला मतदारसंघ महिला राखीव झाल्याने पत्नीला दावेदार करणाऱ्यांमध्ये माजी जि.प. अध्यक्ष नाना ढगे, पांडुरंग देशमुख, गजानन निकम, मनोज चांदूरकर, मिलिंद ठोंबरे, मोहन शिदोडकर अशा सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश आहे.

समर्थकांसाठी आटापिटा

गतवेळच्या पराभवाचा अनुभव डोळ्यापुढे ठेवत या वेळी बडय़ा नेत्यांनी आपल्या गणगोतांना बाजूला सारल्याचे स्पष्ट दिसून येते. जिल्ह्य़ातील खासदार-आमदार किंवा अन्य बडय़ा नेत्यांच्या कुटुंबातून एकही उमेदवारी आलेली नाही. या नेत्यांनी प्रामुख्याने आपल्या कट्टर अनुयायांसाठी प्रयत्न केले. त्यात काही प्रमाणात त्यांना यशही आले. लोकसभा, विधानसभा व पाठोपाठ पालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश प्राप्त करीत काँग्रेस-राकाँ आघाडीस नेस्तनाबूत केले. या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीची भाजप वगळता उर्वरित पक्षांनी धास्तीच घेतल्याचे दिसून येते. मावळत्या जिल्हा परिषदेत काँग्रेस-राकाँचे मिळून सर्वाधिक सदस्य राहले. पण अपक्षांच्या मदतीने भाजपचा झेंडा प्रथमच वर्धा जिल्हा परिषदेवर फ डकला. पालिका निवडणुकीत भाजपने १०० टक्के यश मिळाले. त्याचा धसका घेत काँग्रेस-राकाँने एकत्रित निवडणुका लढण्याचा मनसुबा ठेवला. पण नेत्यांनी या आघाडीला सुरुंग लावल्याने परत हे पक्ष वैरी झाले. आपलीच ताकद असल्याच्या नादात या दोन्ही पक्षांना सर्वच जागांवर उमेदवार मात्र देता आले नाही. याखेरीज बसप, सेना, गोंडवणा गणतंत्र, रिपाइं व काही नामधारी पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. अपक्षांची संख्या घसरली. शिवसेना पालिका निवडणुकीत शून्यावरच स्थिरावली. या वेळी रिकाम्या जागा भरा, असाच प्रयोग दिसून आला. वारंवार उभे राहणाऱ्या इच्छुकांसाठी आवाहन करण्यात आल्यानंतर ५० टक्के जागा सेना लढणार आहे. त्यामुळे भाजप-काँग्रेस-राकाँ-अपक्ष असे लढतीचे चित्र आहे. भाजपच्या उमेदवाऱ्या गटातटात विभागल्याने पक्षचिन्हावरच प्रचाराची भिस्त आहे. मात्र काँग्रेस नेते आमदार रणजीत कांबळे यांनी आर्वी वगळता व आर्वीत आमदार अमर काळेंनी तिकीट वाटप केल्याने या दोघांवरच काँग्रेसच्या अस्तित्वाची जबाबदारी आलेली आहे.

 

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal corporation elections in maharashtra