मुंबई : विकास प्रकल्पांच्या बाबतीत कळसूत्री असलेल्या महाविकास आघाडी सरकारने कितीही पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फायदा होणार नाही. शेतकरी, गोरगरीब, ओबीसी, मराठा, धनगर अशा सर्व घटकांच्या तोंडाला पाने पुसणारा हा महाविकास आघाडीचा निराशाजनक अर्थसंकल्प आहे, असे टीकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सोडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अर्थसंकल्पात ना विकासाला चालना, ना कोणत्याही कल्याणकारी उपाययोजना आहेत. या अर्थसंकल्पातून कोणतीही नवीन दिशा नाही, पुन्हा त्याच त्या घोषणा आणि उर्वरित आमच्या सरकारच्या काळातील योजनांचा गोषवारा त्यात आहे, असे फडणवीस म्हणाले.

या सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत देण्यात आलेली नाही. दोन वर्षांपूर्वीची ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा आज पुन्हा नव्याने करण्यात आली आहे. अवर्षण, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती किंवा पीकविमा यापोटी शेतकऱ्यांना कोणतीही मदत देण्यात आलेली नाही, असे फडणवीस यांनी निदर्शनास आणले.

केंद्राच्या निर्णयानंतर २२ राज्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी केल्या. पण, महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला कोणताही दिलासा दिलेला नाही. सायकलवरून मोर्चा काढणारे आता कोणता मोर्चा काढणार, असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला. फडणवीस म्हणाले की आमच्या काळातील बळीराजा योजना वगळली, तर विदर्भ आणि मराठवाडय़ाला कोणतीही मदत या अर्थसंकल्पातून करण्यात आलेली नाही. मराठवाडा ग्रीडची हत्या करण्यात आली. दुष्काळमुक्तीसाठीच्या सिंचन प्रकल्पांना कोणतीही मदत नाही. उत्तर महाराष्ट्र तर या अर्थसंकल्पात दिसतच नाही. केवळ काही मतदारसंघांपुरता आणि केवळ काही नेत्यांपुरता हा अर्थसंकल्प आहे. बाकी केवळ केंद्राच्या योजनांचा पुनरुच्चार आहे, अशी टीका त्यांनी केली.  करोनाकाळात सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू होऊनसुद्धा पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. सर्वच घटकांची घोर निराशा, या अर्थसंकल्पाने केली आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition leader devendra fadnavis reaction on maharashtra budget 2022 zws