आठवड्याभरापूर्वी मुंबईतील जवळपास ३५ ठिकाणी ईडीनं छापेमारी केली. ही ठिकाणं मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांच्याशी निगडित होती. या ठिकाणी सविस्तर चौकशी केल्यानंतर आता ईडीनं अनिल अंबानी यांना समन्स बजावलं आहे. ३ हजार कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं असून या घोटाळ्यात अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स अनिल धिरूभाई अंबानी ग्रुपच्या कंपन्यांचा सहभाग असल्याचा ईडीचा दावा आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी अनिल अंबानींना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

२०१७ ते १९ या काळात येस बँकेकडून रिलायन्स अनिल धिरूभाई अंबानी ग्रुपच्या कंपन्यांना वेगवेगळ्या प्रमाणात एकूण ३ हजार कोटींची कर्जे वितरीत करण्यात आली. पण या सगळ्या व्यवहारात बेकायदेशीर बाबी घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची चौकशी सध्या ईडीकडून करण्यात येत आहे. ही कर्जाची रक्कम वळती करण्यासाठी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना, प्रमोटर्सला लाच दिली गेल्याचाही संशय ईडीला असून त्याअनुषंगानेदेखील तपास केला जात आहे.

बँकेच्या नियमांचं उल्लंघन

दरम्यान, अनिल अंबानी यांच्या कंपन्यांना कर्जाची रक्कम वळती करण्यासाठी बँकेकडून नियमांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन करण्यात आल्याचं ईडीच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर या सर्व व्यवहारांची चौकशी ईडीकडून केली जात आहे. अंबानींच्या कंपन्यांना कर्ज मंजूर करताना बॅकडेटेड क्रेडिट अप्रूव्हल मेमोरेंडम, कंपन्यांच्या आर्थिक स्थितीची कोणतीही खातरजमा न करता कर्ज मंजुरी अशा बाबी आढळून आल्या आहेत.

येस बँकेशी अंबानींची ‘देवाण-घेवाण’!

ईडीला असाही संशय आहे की रिलायन्स धिरूभाई अंबानी ग्रुपच्या कंपन्यांना कर्जाची रक्कम वर्ग करण्याच्या बदल्यात रिलायन्स म्युच्युअल फंडने येस बँकेच्या एटी१ बाँड्समध्ये तब्बल २८५० कोटींची गुंतवणूक केली.

“ते बॉण्ड नंतर रद्द करण्यात आले आणि पैशांचा घोटाळा झाला. ते पैसे सामान्य लोकांचे होते. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे होते”, अशी माहिती ईडीमधील सूत्रांनी दिली. या प्रकरणाचा सीबीआयकडूनही तपास चालू आहे, असंही सांगण्यात आलं आहे.