पीटीआय, नवी दिल्ली
अदानी समूहाने एडब्ल्यूएल अॅग्री बिझनेस लिमिटेडमधील (पूर्वाश्रमीची अदानी विल्मर लिमिटेड) २० टक्के हिस्सा सिंगापूरच्या विल्मर इंटरनॅशनलला ७,१५० कोटी रुपयांना विकल्याचे गुरुवारी भांंडवली बाजाराला सूचित केले. अदानी यांनी डिसेंबरमध्ये मुख्य पायाभूत सुविधा व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अदानी विल्मरमधील त्यांचा संपूर्ण ४४ टक्के हिस्सा विकण्याची घोषणा केली होती. ताज्या व्यवहारानंतर अदानींचा या संयुक्त कंपनीत आता केवळ १०.४२ टक्के हिस्सा शिल्लक राहिला आहे.
अदानी समूहातील अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडची (एईएल) उपकंपनी अदानी कमोडिटीज एलएलपीने एडब्ल्यूएल (अदानी विल्मर लिमिटेड) मधील हिस्सेदारी ही सहमत झालेल्या किमतीवर विल्मर इंटरनॅशनल, सिंगापूरची उपकंपनी लेन्स प्रा. लि. विकण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार प्रति समभाग ३०५ रुपयांपेक्षा जास्त होणार नाही या शर्तीवर हा व्यवहार पूर्णत्वास गेला. या आधी जानेवारी २०२५ मध्ये, अदानींनी या कंपनीमधील त्यांचा १३.५ टक्के हिस्सा हा प्रति समभाग २७६.५१ रुपये किमतीला विकला आहे. त्या विक्रीनंतर, अदानींकडे एडब्ल्यूएलमध्ये सुमारे ३०.४२ टक्के हिस्सा शिल्लक राहिला होता. ज्यापैकी २० टक्क्यांची आता विक्री केली गेली आहे.
अदानी समूहाच्या ग्राहकोपयोगी उत्पादनाच्या व्यवसायातून पूर्णपणे बाहेर पडण्याच्या योजनेचा भाग म्हणून ही हिस्सा विक्री झाली आहे. नवीनतम व्यवहारानंतर, विल्मर इंटरनॅशनल ही एडब्ल्यूएल अॅग्रीमध्ये ६४ टक्के हिस्सा असलेल्या बहुसंख्य हिस्साधारक बनेल. अदानींना या कंपनीतील संपूर्ण ४४ टक्के हिस्सा विकून १८,८१७ कोटी रुपयेे मिळणे अपेक्षित आहे.