मुंबई : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्धा टक्क्यांची कपात केल्यानंतर, देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेने ठरावीक मुदतीच्या आणि ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात पाव टक्क्यांची कपात मंगळवारी जाहीर केली.एचडीएफसी बँकेने ५० लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या बचत खात्यातील ठेवींवरील व्याजदरही अर्धा टक्क्यांची कपात केली आहे. याआधी, बँक ५० लाख रुपयांपर्यंतच्या बचत खात्यातील शिलकीवर २.७५ टक्के आणि ५० लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या शिलकीवर ३.२५ टक्के व्याजदर देत होती.

आता, सर्व प्रकारच्या बचत खात्यातील शिलकीवर २.७५ टक्के एकसारखा व्याज बँकेकडून दिला जाईल. एचडीएफसी बँक आता मुदत ठेवींवर (३ कोटींपेक्षा कमी रकमेच्या) वार्षिक २.७५ टक्के ते ६.६० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.२५ टक्के ते ७.१० टक्के दराने सुधारीत व्याजदर देऊ केला आहे. तर, आयसीआयसीआय बँकेने मुदत ठेवींवर (३ कोटींपेक्षा कमी रकमेच्या) ३ टक्के ते ६.६ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.५ टक्के ते ७.१ टक्के सुधारीत व्याजदर देऊ केला आहे.