मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने गृहकर्जाच्या व्याजदरात कपात करत तो ७.४५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची शुक्रवारी घोषणा केली. बँकेने कर्ज प्रक्रिया शुल्क देखील माफ केले आहे, ज्यामुळे गृहकर्ज अधिक परवडणारे झाले आहे.

रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी २०२५ पासून रेपो दरात थेट १ टक्क्यांची कपात केली आहे. या कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बँक ऑफ बडोदाने कर्ज व्याजदरात कपात केली आहे. याआधी जूनमध्ये बँकेने गृहकर्ज व्याजदर ८ टक्क्यांवरून ७.५० टक्क्यांपर्यंत कमी केले होते, आता त्यात आणखी ५ आधारबिंदूंची (०.०५ टक्के) कपात केली गेली आहे. नवीन दर येत्या १२ जुलैपासून लागू होणार आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने मात्र रेपो दराशी संलग्न कर्जदरात वाढ केली आहे. येत्या १ जुलै २०२५ पासून तो ८.१५ टक्क्यांवरून तो ८.२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.