मुंबईः एक ना अनेक अनियमितता, बॉलीवूड तारका-राजकीय नेत्यांवर दौलतजादा, रंगेल व फंदी उपद्व्याप, स्थावर मालमत्ता क्षेत्राला मर्यादेपेक्षा जास्त कर्ज, बनावट खाती, दलाली, कमिशन, शाखांच्या साज-सजावटीवर करोडोंचा अनावश्यक खर्च आणि एका कुटुंबाच्या भल्यासाठी बँकेच्या संसाधानांचा उघड गैरवापर वगैरे सारे आरोप घोटाळेग्रस्त ‘न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँके’वर आहेत. तथापि हे आरोप आता पटलावर आलेले नाहीत, तर रिझर्व्ह बँकेच्याच अधिकाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी दोनदा केलेल्या तपासणीतील ही निरीक्षणे आहेत. ‘लोकसत्ता’च्या हाती लागलेल्या या गोपनीय तपासणी अहवालातील ही गंभीर निरीक्षणे का, कशी आणि कोणत्या कारणांनी दुर्लक्षित केली गेली, असा आता प्रश्न आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘न्यू इंडिया’ला बँकबुडीच्या स्थितीपर्यंत लोटणारी ही दुष्कृत्ये माजी अध्यक्ष हिरेन भानू, गौरी भानू आणि त्यांच्या गोतावळ्यातील काही मोजके अधिकारी यांच्याकडून, रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीतच दोन वर्षे बिनबोभाट सुरू राहिली. आता तर ही सारी मंडळी परदेशांत पोबारा करून पळून गेल्याने तपास यंत्रणेचे हातही त्यांच्यापर्यंत पोहचणे अवघड आहे. रिझर्व्ह बँकेच्या २०२३ मधील दुसऱ्या तपासणी अहवालाने बँकेची नाजूक बनलेली आर्थिक स्थिती पाहता, ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी तातडीने कठोर पावले आवश्यक असल्याचे मध्यवर्ती बँकेच्या पर्यवेक्षण विभागाला (डीओएस) शिफारस केली होते. परंतु प्रत्यक्षात तेव्हा लागू असलेल्या ‘एसएएफ’ या देखरेख चौकटीलाच पुढे सुरू ठेवण्यापलीकडे काही झाले नाही. हिरेन भानू हे या बँकेचे माजी अध्यक्ष असून, त्यांना नियामकांच्या निर्देशाने १० महिन्यांपूर्वी पायउतार व्हावे लागले, तर गौरी भानू या संचालक मंडळाच्या बरखास्तीपर्यंत बँकेच्या उपाध्यक्ष होत्या.

रिझर्व्ह बँकेच्या कथित ‘देखरेखी’त शिजत गेलेल्या गैरव्यवहाराचे प्रमाण हे ताज्या उघडकीस आलेल्या १२२ कोटी रुपयांपेक्षा खूप जास्त भरेल, अशी शक्यता आहे. ३१ मार्च २०२३ अखेर बँकेच्या १,३२९ कोटींच्या एकूण कर्ज वितरणात बड्या कर्जदारांचा (संख्येने जवळपास ५०) वाटा जवळपास निम्मा म्हणजेच ६५६.३६ कोटींचा होता. ज्यापैकी ८५ टक्के कर्ज हे ‘एनपीए’ अर्थात त्याची वसुली पूर्णपणे थकली आहे. यापैकी स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपन्यांकडे थकीत कर्ज ४१८ कोटींच्या घरात आहे. ज्यामध्ये स्वतः गौरी भानू संचालक असलेल्या मोटवानी समूहातील कंपन्यांचाही समावेश आहे. हे केवळ एक उदाहरण असून, गोपनीय तपासणी अहवालात बँकेसाठी जोखीम ठरलेल्या आणि भानू दाम्पत्याचा सहभागातून घडलेल्या नियमबाह्य कारवायांचे अनेक नमुने आहेत.

न्यू इंडियातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुसरा ‘पीएमसी बँक घोटाळा’ टाळला जावा म्हणून सर्वप्रथम २९ जानेवारी २०२० रोजी बँकेतील गैरव्यवहार मुद्देसूद नमूद केलेले पत्र रिझर्व्ह बँकेला लिहिले. याच पत्राची दखल घेत, रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासणीत पत्रातील बहुतांश गोष्टी खऱ्या निघाल्याचेही आता स्पष्ट होत आहे. परंतु तपासणी अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी आणि कारवाईसाठी त्वरित हस्तक्षेपाच्या अपेक्षेला रिझर्व्ह बँकेनेच अव्हेरल्याचे दिसून येते.

चंगळवाद, लुटीचेच साम्राज्य

क्लिफर्ड मार्टिस, ए. एल. क्वाड्रोस, रमेश वेकारिया या कामगार नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखविला गेला. भानू दाम्पत्य आणि त्यांच्या मर्जीतील दोन-तीन व्यवस्थापक यांचेच बँकेवर साम्राज्य होते. संचालक मंडळाच्या बैठका केवळ उपचार म्हणून उरकल्या जात. विरोध, मतभेदाला जुमानायचे नाही. त्याची इतिवृत्तातही नोंद होत नसे. पूर्वाश्रमीच्या ‘द लेबर को-ऑपरेटिव्ह बँके’चे ‘न्यू इंडिया’ असे नामकरणच फक्त झाले नाही, तर समाजवादी तत्वविचारही गळून पडला आणि चंगळवाद, लूटच सुरू झाली, असे ‘न्यू इंडिया’ बँकेचे एक माजी संचालक फ्रेडरिक डिसा यांनी खेदाने नमूद केले.

बँकेचा पैसा मौज-मस्तीसाठी…

कामगारांनी सुरू केलेल्या या बँकेने छोटी-मोठी कर्जे वितरीत करणे सोडूनच दिले. बँकेला बुडवायचेच यासाठी  मोठमोठी कर्जे तीही स्वकियांमध्ये वाटप करायचे आणि त्यावर मलिदा कमावण्याचा उद्योग भानू दाम्पत्याने सुरू केला, असे बँकेच्या सुरुवातीपासून घडणीत वाटा असलेले सभासद आणि ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते सचिदानंद शेट्टी म्हणाले. माध्यम सल्लागार, वलयांकित व्यक्ती, नोकरशहा, राजकीय नेते हे प्रभाव मंडळ आणि हेच त्यांचे सुरक्षा कवच होते. या मंडळीच्या मौज-मस्तीची खास तजवीज भानू दाम्पत्य बँकेचा पैसा वापरून करीत असे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bi ignored the chaos in new india for two years print eco news amy