मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या युनियन बँक आणि कॅनरा बँकेने सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत अनुक्रमे ४,२४९ कोटी आणि ४,७७४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. गेल्या काही वर्षात बँकिंग क्षेत्रातील सुधारणांमुळे या बँकांच्या कामगिरीत सुधारणा झाली असून त्या अधिक नफाक्षम बनल्या आहेत.
कॅनरा बँकेच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत १९ टक्क्यांची वाढ झाली असून तो ४,७७४ कोटी रुपयांवर पोहोचला. बँकेने गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ४,०१५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. दुसऱ्या तिमाहीत एकूण उत्पन्न ३८,५९८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ३४,७२१ कोटी रुपयांवर होते.
युनियन बँकेच्या नफ्यात सरलेल्या तिमाहीत १० टक्के घट झाली असून तो ४,२४९ कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ४,७१९.७ कोटी रुपयांचा होता. बँकेचे इतर उत्पन्न ६.२५ टक्क्यांनी घसरून ४,९९५ कोटी रुपयांवर (५,३२८ कोटी रुपयांवरून) आले. या दरम्यान बँकेच्या तरतुदी २४.४ टक्क्यांनी घसरून २,५६५ कोटी रुपयांवर आल्या. याआधीच्या जून तिमाहीत युनियन बँकेचा नफा ३.२५ टक्क्यांनी वाढून ४,११६ कोटी रुपये नोंदवला गेला होता. उत्पन्नाच्या बाबतीत, बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत २.६ टक्क्यांनी कमी होऊन ८,८१२ कोटी रुपयांवर आले आहे, जे गेल्यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत ९,०४७ कोटी रुपये होते.
कॅनरा बँकेचे व्याज उत्पन्न गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत २९,७४० कोटी रुपयांवरून ३१,५४४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मात्र सरलेल्या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्नात घट दिसून आली आणि ते गेल्या वर्षीच्या ९,३१५ कोटी रुपयांवरून ९,१४१ कोटी रुपयांपर्यंत खालावले. कार्यात्मक नफा देखील वाढून ८,५८८ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ७,६५४ कोटी रुपये होता. बँकेची एकूण अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) सप्टेंबर २०२५ च्या अखेरीस एकूण कर्जाच्या तुलनेत २.३५ टक्के आहे. जी मागील वर्षीच्या याच कालावधीत ३.७३ टक्के होती. तसेच, सप्टेंबर तिमाहीत निव्वळ एनपीए ०.५४ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.
परिणामी, बुडीत कर्जांसाठीची तरतूद गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील २,५८७ कोटी रुपयांवरून, यंदा १,५०४ कोटी रुपयांपर्यंत खाली आली. बँकेचा एकूण व्यवसाय सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंत २३,५९,३४४ कोटी रुपये होता. तो १३.५ टक्क्यांनी वाढून २६,७८,९६३ कोटी रुपयांवर पोहोचला. एकूण ठेवींमध्ये १३.४ टक्क्यांनी वाढ होऊन गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस १३,४७,३४७ कोटी रुपयांवरून १५,२७,९२२ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहे तर एकूण कर्जे १३.७ टक्क्यांनी वाढून १०,११,९९७ कोटी रुपयांवरून ११,५१,०४१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
