मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आयुर्विमा क्षेत्रातील फ्युचर जनराली इंडिया लाइफ इन्शुरन्समधील २५.१८ टक्के हिस्सा खरेदी केला असून, त्यायोगे संयुक्त भागीदारीसह आयुर्विमा व्यवसायात पाऊल टाकले आहे. दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत सुमारे ५७ कोटी रुपयांना हा हिस्सा खरेदी करण्यात आला आहे, असे सेंट्रल बँकेने प्रमुख बाजार मंचांना गुरुवारी सूचित केले. चालू महिन्यातील ४ जूनला ६५.४३ कोटी समभाग अधिग्रहणासह, मुंबईत मुख्यालय असलेल्या बँकेने विमा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. सध्या, सेंट्रल बँकेकडे फ्युचर जनराली इंडिया लाइफमधील २५.२८ टक्के हिस्सेदारी आहे. या विमा कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १,८१०.५३ कोटी रुपयांचा एकूण प्रीमियम उत्पन्न मिळवले होते.

सेंट्रल बँकेने दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत लावलेल्या बोलीच्या माध्यमातून फ्युचर जनराली इंडिया लाइफ इन्शुरन्स मधील २५.१८ टक्के हिस्सा खरेदी केला होता. त्याला भारतीय स्पर्धा आयोगाने अर्थात ‘सीसीआय’ने मंजुरी दिली होती.

‘फ्युचर जनराली इंडिया लाइफ’ ही बचत विमा, गुंतवणूक योजना (यूलिप), मुदत विमा योजना, आरोग्य विमा योजना, लहान मुलांशीसंबंधित योजना, सेवानिवृत्ती योजना, ग्रामीण विमा योजना आणि गट विमा योजनांची विक्री करते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, सेंट्रल बँकेने कर्जबाजारी फ्युचर एंटरप्रायझेस लिमिटेडच्या आयुर्विमा आणि सामान्य विमा उपक्रमांमधील हिस्सा संपादनासाठी यशस्वी बोली सादर केली होती. फ्युचर जनराली इंडिया लाइफ इन्शुरन्स आणि फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमधील फ्युचर एंटरप्रायझेस लिमिटेडच्या श्रेणी १ मालमत्तेच्या विक्रीसाठी ‘कर्जदात्यांच्या समिती’ने त्यांना यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले होते.

फ्युचर जनराली इंडिया लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये इटलीचा जनराली समूह ७३.९९ टक्के हिश्शासह सर्वात मोठा भागधारक आहे. तर फ्युचर एंटरप्रायझेसकडे उर्वरित २५ टक्के हिस्सा आहे. शिवाय या दिवाळखोर समूहाची फ्युचर जनराली लाइफ इन्शुरन्समध्ये ३३ टक्के हिस्सेदारी होती. मुंबईत मुख्यालय असलेल्या फ्युचर जनराली लाइफची २००६ मध्ये त्याची स्थापना झाली असून, कंपनीची भारतातील १,३०० हून अधिक ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या आणि भागीदारी असलेल्या ठिकाणी उपस्थिती आहे.