पीटीआय, नवी दिल्ली : चिनी उद्योजक जॅक मा यांच्या ॲन्ट फायनान्शियलने मंगळवारी पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्समधून बाहेर पडून त्यांचा संपूर्ण ५.८४ टक्के हिस्सा सुमारे ३,८०३ कोटी रुपयांना विकला आहे. या हिस्सा विक्रीनंतर, राष्ट्रीय शेअर बाजारात वन९७ कम्युनिकेशन्सचे समभाग १.४५ टक्क्यांनी घसरून १,०६२.६० रुपयांपर्यंत खाली आहे.

ॲन्ट समूहाने त्यांच्या संलग्न ॲन्टफिन (नेदरलँड्स) होल्डिंगच्या माध्यमातून नोएडास्थित वन९७ कम्युनिकेशन्सचे समभाग विकले आहेत. ॲन्ट समूह, ज्याला पूर्वी ॲन्ट फायनान्शियल म्हणून ओळखले जात होते, ही चिनी समूह अलिबाबा समूहाची संलग्न कंपनी आहे. ॲन्ट फायनान्शियलकडून सुमारे ३.७३ कोटी समभाग म्हणजेच ५.८४ टक्के हिस्सा विक्री करण्यात आला. प्रति समभाग १,०२० रुपयांनी समभागांची विक्री करण्यात आली, जे सोमवारी एनएसईवर पेटीएमच्या १,०७८.२० रुपयांच्या बंद भावापेक्षा ५.४ टक्क्यांपर्यंत सूट दर्शवतात. यातून ॲन्ट फायनान्शियलला ३,८०३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जून तिमाहीच्या अखेरीस, ॲन्ट फिनकडे (नेदरलँड्स) पेटीएमची ५.८४ टक्के हिस्सेदारी होती. जॅक मा यांच्याकडे अलीबाबा समूहाची मालकी असून ॲन्ट फायनान्शियल अलीबाबा समूहातील एक कंपनी आहे.

दरम्यान, पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे रेझिलिएंट अ‍ॅसेट मॅनेजमेंट बीव्ही ही परदेशी कंपनी आहे, जी वन९७ कम्युनिकेशन्समध्ये एकत्रितपणे १९.३१ टक्के हिस्सा धारण करून एकत्रितपणे सर्वात मोठी भागधारक आहे. याव्यतिरिक्त, मुंबई शेअर बाजाराकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, हाँगकाँगस्थित खासगी इक्विटी फर्म सैफ पार्टनर्सकडे जून २०२५ पर्यंत पेटीएमची १५.३४ टक्के हिस्सेदारी आहे.

या वर्षी मे महिन्यात, चिनी फिनटेक दिग्गज ॲन्ट समूहाने २.५५ कोटींहून अधिक समभाग २,१०३ कोटी रुपयांना विकले होते. त्यामाध्यमातून ४ टक्के हिस्सेदारी कमी करण्यात आली होती.  अलीबाबा आणि ॲन्ट फायनान्शियल हे पेटीएममध्ये सुरुवातीचे गुंतवणूकदार होते आणि २०१५ पासून त्यांनी ८५.१ कोटी अमेरिकी डॉलरची गुंतवणूक केली होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये वन९७ कम्युनिकेशन्स सूचिबद्ध झाल्यानंतर कंपनीने शेअर बाजारात समभागांची विक्री सुरू केली.

मंगळवारच्या सत्रात पेटीएमचा समभाग २.४३ टक्क्यांच्या घसरणीसह १,०५२.२० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे ६७,२०६ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे. समभागाने गेल्या महिन्याभरात १३.०९ टक्के तर तीन महिन्यात २१.५६ टक्के परतावा दिला आहे.