मुंबई: भांडवली बाजाराकडे किरकोळ गुंतवणूकदारांचा ओढा वाढत असून रोज हजारोंच्या संख्येने पडत असलेली डीमॅट खात्यांची भर याला प्रतिबिंबीत करते. २०१९ मधील ३.६ कोटींवरून, मार्च २०२५ अखेर डीमॅट खात्यांच्या संख्येने १९.४ कोटींपुढे मजल मारली आहे, अशी माहिती भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या ‘सेबी’च्या कार्यकारी संचालक रुची चोजर यांनी दिली.

भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांमधील देशांतर्गत संस्थात्मक मालकी १३ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढली आहे, तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची मालकी २२ टक्क्यांवरून १७ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या सहभागातून हे घडत आहे.

सेबीचा नियामक दृष्टिकोन हा भांडवल निर्मिती, प्रणालीगत स्थिरता आणि गुंतवणूकदार संरक्षणाचे संतुलन साधण्यावर लक्ष केंद्रित करतो. विश्वास हा गुंतवणुकीचा आधारस्तंभ आहे, असे रुची चोजर म्हणाल्या. याचाच परिणाम म्हणून डिमॅट खात्यांची संख्या सात वर्षांच्या कालावधीत पाच पटींनी वाढून १९.४ कोटींवर गेली आहे.

भांडवली बाजाराच्या उत्क्रांतीच्या टप्प्याबाबत बोलताना चोजर म्हणाल्या की, गेल्या तीन दशकात भारतीय बाजाराने जगातील आघाडीच्या १० भांडवली बाजारांमध्ये स्थान मिळवले आहे. मुख्यत लवचिकता, समावेशकता आणि देशांतर्गत वाढत्या सहभागामुळे भांडवली बाजरांना चालना मिळाली आहे.

गेल्या १० वर्षांत, भारतीय कंपन्यांनी समभाग आणि कर्जरोख्यांच्या मध्यमातून सुमारे ९३ लाख कोटी रुपयांची निधी उभारणी केली. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये विक्रमी ४.३ लाख कोटी रुपये उभारले गेले, ज्यामध्ये प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून १.७ लाख कोटी रुपये उभारले गेले आहेत. ही वाढ केवळ धोरण आणि पायाभूत सुविधांमधील वाढीमुळे नसून गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याने शक्य झाली आहे.