मुंबई : देशाच्या बहुतांश भागात झालेला समाधानकारक पाऊस, केंद्र सरकारच्या कर कपातीमुळे वाढलेली खरेदी क्षमता, बाजारातील आकर्षक योजना आणि शुभ मुहूर्तावर खरेदीची परंपरा यामुळे गुरुवारी दसऱ्यानिमित्त सराफा बाजारात सोने खरेदीचा उत्साह दिसून आला. किमतीने उच्चांक गाठला असताना, यंदा विक्रीत गेल्या वर्षापेक्षा वाढ होण्याच्या पारंपरिक पेढ्यांच्या आशा आहेत.

चालू वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमती तब्बल ५० टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. त्यामुळे दसऱ्याला सोन्याचा भाव आता दहा ग्रॅमसाठी १.१८ लाखांपुढे पुढे गेला आहे. किरकोळ सराफ पेढीत, कर आणि अन्य शुल्क जमेस धरून तो आणखी दोन ते तीन हजारांनी जास्त आहे. तरी परंपरेमुळे यंदाही उत्साहात सोने खरेदी सुरू असल्याचे व्यावसायिकांशी बोलताना जाणवले. मुंबई सराफा बाजारात मंगळवारच्या तुलनेत सोन्याचा भाव प्रति तोळा ५५० रुपयांनी कमी झाला. घाऊक दर प्रति तोळा १,१८,६९० रुपयांवर व्यवहार करत होता. चांदी देखील प्रति किलो १,४५,७१५ रुपये या विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे.

गेल्या काही काळापासून सराफा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारत असल्याचे बाजारात फेरफटका मारल्यावर दिसून आले. शहरांच्या विस्ताराबरोबरच पारंपरिक पेढ्यांचा शाखा विस्तारही होताना दिसत आहे. शहराच्या नव्या विस्तारीत क्षितिजावर प्रख्यात सराफा पेढ्यांचा उदय होताना दिसत आहे.

‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, की दसऱ्याच्या खरेदीला सुरुवात खूप जोरदार झाली आहे. दागिन्यांव्यतिरिक्त, सोने आणि चांदीच्या पदके, वळी, नाणी यातील गुंतवणूक म्हणून मागणी मजबूत आहे. किमतीतील चढउतार असूनही ग्राहक आत्मविश्वासाने खरेदी करत आहेत. सणाच्या निमित्ताने उत्साह खूप आहे आणि या हंगामात गेल्या वर्षीपेक्षा जास्त विक्री होईल, अशी अपेक्षा आहे. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगड्या, हार तसेच हिऱ्यांचे अलंकार यांची चांगली कामगिरी आहे.

आजकाल गुंतवणूक म्हणून म्युच्युअल फंडाच्या ‘गोल्ड ईटीएफ’ची युनिट्स आणि गोल्ड बाँड्स असे ‘पेपर गोल्ड’ घेण्याकडेही ग्राहकांचा कल वाढत असल्याचे गुंतवणूकतज्ज्ञांनी सांगितले.

जागतिक अनिश्चितता, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून आणखी व्याजदर कपातीची अपेक्षा आणि त्या परिणामी डॉलरचे कमकुवत बनणे, या घटकांमुळे सोने-चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढीची मोठी शक्यता आहे. वर्षअखेरपर्यंत ‘एमसीएक्स’वर सोने आणि चांदी अनुक्रमे प्रति १० ग्रॅम १,२०,००० रुपये आणि प्रति किलो १,५०,००० रुपयांची पातळी गाठू शकते. – अनुज गुप्ता, सेबी-नोंदणीकृत विश्लेषक

जळगावात दरवाढीमुळे विक्रीत घट

जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दसऱ्यानिमित्त खरेदीला उठाव येण्याची व्यावसायिकांची आशा फोल ठरली. उच्चांकी दरवाढीसह नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमडलेल्या ग्रामीण आणि शहरी अर्थकारणाचा बराचसा परिणाम सोने विक्रीवर झाला. बुधवारपेक्षा गुरुवारी दरात काहीशी घट झाली असतानाही सोने विक्रीतून होणारी एकूण आर्थिक उलाढाल १० ते २० टक्क्यांनी कमी झाली.