मुंबई : चष्मे विक्रेता लेन्सकार्ट सोल्युशन्सच्या शेअर्ससाठी गुंतवणूकदारांमध्ये प्रारंभिक समभाग विक्रीत (आयपीओ) जो उत्साह दिसून आला, तितकीच त्यांच्या पदरी निराशा या शेअर्सनी बाजारातील पदार्पणाला दिली. सोमवारी कंपनीचे शेअर्स आयपीओसाठी निश्चित केलेल्या विक्री किमतीच्या तुलनेत ३ टक्के घसरणीसह सूचिबद्ध झाले आणि पहिल्या दिवसाअखेरीस विक्री किमतीच्या पातळीवर जवळजवळ स्थिर राहिले.
आयपीओमध्ये बोली यशस्वी ठरून शेअर्स हाती लागलेल्या गुंतवणूकदारांना. ही संथ सुरुवात तात्पुरती की, कंपनीच्या क्षमतेसंबंधाने असलेले हे पूर्वसंकेत असा प्रश्न आता सतावत आहे. लेन्सकार्टच्या समभागांनी आयपीओसाठी जे मूल्यांकन मिळविले ते समर्पक ठरेल, अशी नफ्यातील शाश्वत वाढीची कामगिरीही कंपनीने करून दाखविली पाहिजे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.मुंबई शेअर बाजारावर हा शेअर ३९० रुपयांवर सूचीबद्ध झाला, जो आयपीओतून गुंतवणूकदारांच्या हाती आलेल्या विक्री किमतीपेक्षा २.९८ टक्क्यांनी कमी होता. पुढे प्रारंभिक व्यवहारात तो ११.५२ टक्क्यांनी घसरून ३५५.७० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
तथापि, लवकरच त्याने सर्व नुकसान भरून काढले आणि २.९३ टक्क्यांनी वाढून तो ४१३.८० रुपयांवर पोहोचला. कंपनीचे शेअर्स दिवसाच्या शेवटी ४०३.३० रुपयांवर बंद झाले, जी अवघी ०.३२ टक्क्यांची वाढ दर्शविते. एनएसईवर, हा शेअर दिवसअखेर ०.६३ टक्क्यांनी वाढून ४०४.५५ रुपयांवर बंद झाला. लेन्सकार्ट सोल्युशन्स लिमिटेडच्या प्रारंभिक विक्री मागील मंगळवारी बंद झाली, तेव्हा त्यात २८.२६ पटीने अधिक भरणा करणारा प्रतिसाद मिळविला, ज्यामध्ये संस्थात्मक खरेदीदारांचा सहभाग लक्षणीय होता. ७,२७८ कोटी रुपयांच्या या आयपीओसाठी प्रति शेअर ३८२ रुपये ते ४०२ रुपये असा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला होता.
लेन्सकार्टने आयपीओमधून मिळणारे उत्पन्न धोरणात्मक उपक्रमांसाठी वापरण्याचा प्रस्तावित केले आहे, ज्यामध्ये भारतात नवीन कंपनी-संचालित, कंपनी-मालकीचे स्टोअर्स स्थापन करण्यासाठी भांडवली खर्च आणि या स्टोअर्ससाठी लीज, भाडे आणि परवाना करारांतर्गत देणी भागविण्याचा समावेश आहे.या शिवाय कंपनीने सांगितलेल्या इतर काही उद्दिष्टांमध्ये, तंत्रज्ञान आणि क्लाउड पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक, ब्रँड जागरूकता वाढविण्यासाठी ब्रँड मार्केटिंग आणि व्यवसाय प्रमोशन, संभाव्य अज्ञात अजैविक अधिग्रहण आणि सामान्य कॉर्पोरेट हेतू यांचा समावेश होता.
वर्ष २००८ मध्ये स्थापन झालेल्या लेन्सकार्टने, २०१० मध्ये ऑनलाइन चष्म्यांचे प्लॅटफॉर्म म्हणून सुरुवात केली आणि २०१३ मध्ये नवी दिल्लीत त्यांचे पहिले भौतिक विक्री दालन उघडले. आज कंपनीचे देशभरात महानगरे, तसेच प्रथम व द्वीतीय श्रेणी शहरांत दालने, तसेच काही आशियाई देशांसह आंतरराष्ट्रीय उपस्थितीही आहे.
