भू-राजकीय तसेच आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणांत सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात असलेल्या हवालदिल गुंतवणूकदारांच्या वाढत्या ओढा पाहता, मंगळवारी इतिहासात पहिल्यांदाच मौल्यवान धातूच्या वायदा भाव प्रति औंस ४,००० अमेरिकी डॉलरपर्यंत वाढल्याचे दिसून आले.सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतींनी अस्मान गाठले असून, १९७० नंतर सोन्याच्या तेजीचे यंदाचे हे सर्वोत्तम वर्ष ठरू पाहत आहे. अमेरिकेत वायदे बाजारात, सोन्याचे व्यवहार प्रति औंस ४,००५.८० डॉलरच्या पातळीवर मंगळवारी सुरू होते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापार व्यवस्थेला आव्हान दिल्याने आणि तेथील मध्यवर्ती बँक असलेल्या ‘फेडरल रिझर्व्ह’च्या स्वातंत्र्यालाही धोका निर्माण झाल्यामुळे या वर्षी सोन्याच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

जगभरात मध्यवर्ती बँका आणि किरकोळ गुंतवणूकदार अविरतपणे सोने खरेदी करत आहेत. अमेरिकेच्या व्यापार निर्बंधांच्या जोखमीपासून बचावाचा वेगवेगळ्या सरकारच्या प्रयत्नांचा भाग म्हणून मध्यवर्ती बँकांचा आणि महागाईला मात देणारा सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून वैयक्तिक गुंतवणूकदारांचा मौल्यवान धातूकडे ओढा आहे.सप्टेंबरअखेरीस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेल्या कपातीने मौल्यवान धातूच्या किमती तीव्रपणे वाढ सुरू आहे. व्याजदर कपातीमुळे बाँड्ससारख्या कर्ज साधने गुंतवणूकदारांसाठी कमी आकर्षक ठरली आहेत. त्यातच या वर्षी बाजाराला व्याजदरात आणखी दोन कपातींची अपेक्षा आहे, जे सोन्याचे आकर्षण दुणावणारे ठरेल.

भारतात १,२२,२३१ चा उच्चांक

भारतातील वायदे बाजार ‘एमसीएक्स’वर, मंगळवारी सोन्याच्या फेब्रुवारी २०२६ मध्ये डिलिव्हरीचा वायदा भाव ६४८ रुपयांनी किंवा ०.५३ टक्क्यांनी वाढून १,२२,२३१ रुपये प्रति १० ग्रॅम या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला. डिसेंबरमध्ये डिलिव्हरीचा भावही ६५१ रुपयांनी वाढून १,२०,९०० रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. सोन्याचे आंतरराष्ट्रीय एकक हे औंस असून, एक औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम इतके वजन भरते. त्या अर्थी, आंतरराष्ट्रीय किमती औंसाला ४,००० डॉलरपुढे गेल्याने, भारतात सोने प्रति १० ग्रॅमसाठी त्या १,२५,४९१ रुपयांची (रुपया/डॉलर विनिमय दर ८८.८० गृहित धरल्यास) पातळी गाठणारे ठरेल. सोने ही अशी मालमत्ता आहे, जी गुंतवणूक भांडारात सद्य:स्थितीत १५ टक्के तरी हिस्सा राखणारी असावी, असा जगभरातील गुंतवणूक सल्लागारांची शिफारस असून, ती भारतीयांना नक्कीच अनुसरता येईल.