मुंबई : भांडवली बाजार नियंत्रक संस्था ‘सेबी’ने सोमवारी आणखी सहा कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्रीस (आयपीओ) मंजुरी दिली. या सहा कंपन्या मिळून आयपीओच्या माध्यमातून ९ हजार कोटी रुपयांची निधी उभारणी करणे अपेक्षित असून, गुंतवणूकदारांसाठी ही एक मोठी सुसंधी असेल.

म्युच्युअल फंड क्षेत्रातील कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, वाहन निर्मिती क्षेत्रातील हिरो मोटर्स, सौर उपकरणे उत्पादक एमव्ही फोटोव्होल्टेक पॉवर, वित्ततंत्रज्ञान क्षेत्रातील पाईन लॅब्स, बँकिंग व स्मार्ट कार्ड उत्पादक मणिपाल पेमेंट अँड आयडेंटिटी सोल्यूशन्स आणि एमटीआर फूड्सची पालक कंपनी ओर्कला इंडिया या सहा कंपन्यांनी ‘आयपीओ’साठी मंजुरी मिळविली आहे. या सहा कंपन्यांकडून सुमारे ९ हजार कोटी रुपये भांडवली बाजारातून उभारण्यात येतील. हा निधी प्रामुख्याने व्यवसाय विस्तार, कर्जफेड आणि सध्याच्या भागधारकांना बाहेर पडण्याचा पर्याय यासाठी वापरण्यात येणार आहे.

या कंपन्यांनी आयपीओच्या मंजुरीसाठी सेबीकडे प्राथमिक प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर त्यांना २ ते १२ सप्टेंबरदरम्यान सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. या सर्व कंपन्या मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार अशा दोन्हीकडे सूचिबद्ध होतील.

सुमारे दोन दशकांच्या अवधीनंतर आलेल्या टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओनंतर, आता भांडवली बाजाराला आजमावणारी टाटा समुहातील दुसरी कंपनी अर्थात टाटा कॅपिटल लिमिटेडची सुमारे १७,००० कोटींची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात होण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये टाटा कॅपिटलने भांडवली बाजार नियामक सेबीकडे मसुदा प्रस्ताव सादर केला होता.

ऑक्टोबर २०२४ मध्ये ह्युंदाई मोटर इंडियाच्या सुमारे २७,८७० कोटी रुपयांच्या आयपीओनंतर टाटा कॅपिटलचा मोठा आयपीओ बाजारात धडकणार आहे. अलिकडेच म्हणजेच जुलैमध्ये आलेल्या ‘एनएसडीएल’च्या ४,००० कोटी रुपयांच्या विक्रीने देखील आयपीओ बाजाराला चैतन्य मिळवून दिले होते.

चालू वर्षात ५५ कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून भांडवली बाजारातून ७५ हजार कोटी रुपयांची निधी उभारणी केली आहे. याचवेळी पुढील दोन ते तीन आठवड्यांत सुमारे डझनभर कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल होतील.