लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: देशातील गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राच्या विकास आणि प्रोत्साहनासाठी कार्यरत ‘नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल’ अर्थात ‘नरेडको’च्या महाराष्ट्र विभागाकडून आयोजित ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ला शुक्रवारी उद्घाटनादिवशीच पाचशेहून अधिक नवीन गृहनिर्माण प्रकल्पांचे अनावरण यावेळी करण्यात आले, ज्यांचे एकूण मूल्य १ लाख कोटींपेक्षा अधिक आहे. हे गृहनिर्माण प्रकल्पांचे प्रदर्शनाचे रविवार, २८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
हजारो संभाव्य खरेदीदारांनी, मोठ्या सवलतीसह घर उपलब्ध करणारे गृहनिर्माण प्रकल्प आणि अल्पदरात वित्तपुरवठा करणाऱ्या बँका व वित्तसंस्था या प्रदर्शनानिमित्त एकाच मंचावर एकत्र आल्या आहेत. अगदी परवडणाऱ्या घरापासून ते आलिशान मालमत्ता या सर्वांचे मिळून हे प्रदर्शन गृहखरेदीदारांचे स्वप्न पूर्ण करणारे ठिकाण बनेल.
दिवाळी सणोत्सवात देशभरात १.३५ लाख ते १.४० लाख घरे विकली जाऊ शकतात, जी मागील वर्षांच्या तुलनेत अधिक राहील. सणोत्सवाच्या काळात घर खरेदीसाठी चौकशीत आणि व्यवहारांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या १५-२० टक्क्यांनी वाढ दिसत आहे आणि अनेक प्रमुख शहरांमध्ये तिमाहीत त्यात दुप्पट वाढ दिसत आहे. ‘होमथॉन’च्या या आवृत्तीत आणखी एक मैलाचा दगड गाठला गेला आहे. ५०० हून अधिक प्रकल्प आणि त्यांचे मूल्य १ लाख कोटींहून अधिक आहे. घर खरेदीदारांना २८ सप्टेंबरपूर्वी निर्णायकपणे पाऊल टाकण्याची ही एक अपवादात्मक संधी आहे, असे ‘नरेडको महाराष्ट्र’चे अध्यक्ष प्रशांत शर्मा म्हणाले.
नरेडको महाराष्ट्र पहिल्यांदाच एजंट आणि चॅनेल पार्टनर्ससाठी ‘द रिअल्टर्स कॉन्क्लेव्ह २०२५’ कार्यक्रम आयोजित करणार आहे. होमथॉनच्या दुसऱ्या दिवशी या विशेष मेळाव्यात २,५०० हून अधिक चॅनेल पार्टनर्स एकत्र येतील अशी अपेक्षा आहे.
आकर्षण काय?
– प्रोजेक्ट पॉवर प्ले: मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर आणि आसपासच्या प्रदेशांतील ५०० हून अधिक नवीन प्रकल्प
– आघाडीच्या बँका आणि एचएफसींकडून स्टॅम्प ड्युटी माफी, नोंदणी भत्ते आणि कमी व्याजदराच्या गृहकर्जासह विशेष उत्सवी सवलती
– गोदरेज प्रॉपर्टीज, अदानी रिॲल्टी, हिरानंदानी, महिंद्र लाईफस्पेसेस, रेमंड रिॲल्टी आणि इतर आघाडीच्या कंपन्यांचा समावेश
– पहिल्यांदाच, इंटरनॅशनल पॅव्हेलियन क्युरेटेड परदेशी मालमत्ता पर्याय उपलब्ध