मुंबईः भांडवली बाजाराला मंगळवारी झालेल्या नफावसुलीने घसरणीने घेरले असले तरी, संरक्षणाशी संबंधित समभागांमध्ये गुंतवणूकदारांकडून खरेदीचा भर राहिला. परिणामी भारत डायनॅमिक्सचा समभाग तब्बल ११ टक्क्यांहून अधिक वधारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सायंकाळी राष्ट्राला संबोधित करताना ‘मेड इन इंडिया’ संरक्षण उपकरणे तयार करण्यावर भर दिला आणि त्या सज्जतेची हीच वेळ आहे असे नमूद केले. भारत-पाकिस्तान शस्त्रबंदीच्या घोषणेमुळे सध्या सीमाभागांतील संकटावर ताबा मिळविला गेला असला तरी संघर्ष संपलेला नाही. संरक्षण उपकरणे आणि प्रणालींची वाढती गरज त्यातून अधोरेखित झाली आहे आणि अपेक्षित मागणी पूर्ण करण्यासाठी कार्यादेशांच्या पूर्ततेवर कंपन्यांनी लक्ष केंद्रित केले आहे, असे ओम्नीसायन्स कॅपिटलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापक अश्विनी शमी यांनी मत व्यक्त केले.

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत शेजारील देशात दहशतवादी स्थळांवर ७ मे रोजी केलेल्या हल्ल्यानंतर, संरक्षणाशी संबंधित समभागांवर गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केले आहे. सरलेल्या शुक्रवारी आणि कालच्या सोमवारीही संरक्षण समभाग वाढलेल्या खरेदीने लक्षणीय वधारले.

मुंबई शेअर बाजारात भारत डायनॅमिक्सचा समभाग ११.१६ टक्क्यांनी, अॅक्सिसकेड्स टेक्नॉलॉजीज ५ टक्क्यांनी, डेटा पॅटर्न ४.०५ टक्क्यांनी, भारत इलेक्ट्रॉनिक्स ४.०१ टक्क्यांनी, तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ३.८१ टक्क्यांनी वधारला.

युद्धनौकांच्या निर्मितीतील कोचीन शिपयार्ड ३.७० टक्के, तर माझगांव डॉक शिपबिल्डर्स ३.३८ टक्के, मिश्र धातू निगम ३.४४ टक्क्यांनी, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज २.८४ टक्क्यांनी आणि डीसीएक्स सिस्टम्स २.८१ टक्क्यांनी वधारले. ड्रोन उत्पादक आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीचे समभाग ९.२६ टक्क्यांनी आणि ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्स ४.९९ टक्क्यांनी वधारले.

आकाश एसएएम आणि इलेक्ट्रॉनिक युद्धासारख्या स्वदेशी संरक्षण प्रणालींच्या मोठ्या यशाने विश्वासार्हता आणि प्रभावी कामगिरी दर्शविली आहे. देशाच्या सीमा मजबूत करण्याची आणि आपली संरक्षण सज्जता वाढविण्याची गरज पाहता संरक्षण उपकरणांची निरंतर मागणी वाढत राहिल, असे अश्विनी शमी म्हणाले.

राफेल निर्मात्या डसॉल्टची आपटी

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वापरात आलेल्या राफेल लढाऊ विमानांची उत्पादक फ्रेंच संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी डसॉल्ट एव्हिएशनच्या समभागांत मंगळवारी युरोपीय शेअर बाजारात ७ टक्क्यांची घसरण झाली. मागील सलग पाच व्यवहार सत्रांत तो १० टक्क्यांनी आपटला आहे. दरम्यान, पाकिस्तानला जे-१० लढाऊ विमानांचा पुरवठा करणारी चिनी विमान निर्माता कंपनी चेंगडू एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनच्या (सीएसी) समभाग मूल्यात ९.३१ टक्क्यांनी घसरण झाली. तथापि आधीच्या काही दिवसांत या समभागाने तब्बल ६० टक्क्यांची झेप दाखविली आहे.