मुंबई : जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक यांच्यातील संयुक्त भागीदारीचा उपक्रम असलेल्या जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंटने गुंतवणूकदारांसाठी जिओब्लॅकरॉक फ्लेक्सी कॅप हा नवीन इक्विटी फंड आणल्याची घोषणा केली आहे. या फंडाला ब्लॅकरॉकच्या सिस्टेमॅटिक अॅक्टिव्ह इक्विटीज (एसएई) धोरणाचे पाठबळ लाभलेले आहे.
नवीन फंड योजना (एनएफओ) २३ सप्टेंबर २०२५ ला खुली झाली असून मंगळवार ७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत त्यात गुंतवणुकीची संधी आहे.ब्लॅकरॉकचे एसएई हे धोरण बिग डेटा, अतिप्रगत विश्लेषण पध्दती आणि मानवी कौशल्य यांचा वापर करते. भारतीय गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी हे धोरण कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. त्यात अगदी समाज माध्यमावरील संभाषणरुपी माहिती ते उपग्रहाने संकलित केलेली माहिती अशा पारंपारिक आणि पर्यायी माहितीच्या (डेटा) विश्लेषणातून गुंतवणुकीचा अचूक दृष्टीकोन सादर करणे, हे एसएई धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
फ्लेक्सी कॅप फंड ही इक्विटीतील सक्रिय गुंतवणुकीची (अॅक्टिव्ह) पहिली योजना असून ती ब्लॅकरॉकची खासियत असलेल्या सिस्टेमॅटिक अॅक्टिव्ह इक्विटीज धोरणाचा वापर करते. गुंतवणूकदारांना गतिमान, विभिन्न आणि अतिशय कमी खर्चात गुंतवणुकीचे पर्याय सादर करण्याची वचनबद्धता यातून प्रतिबिंबित होते.
एसएई धोरणाच्या आधारे प्रामुख्याने शेअरबाजाराच्या विविध चढउतारांत नियंत्रित जोखीम चौकटीत शिस्तबद्ध पध्दतीने गुंतवणूक करत गुंतवणूकदारांना दीर्घकालीन मूल्य प्रदान करणे, हे या फंडाचे उद्दिष्ट आहे, असे जिओ ब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंटचे मुख्य गुंतवणूक अधिकारी ऋषी कोहली म्हणाले. सक्रिय पध्दतीने केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत ब्लॅकरॉक सिस्टेमॅटिकने आपल्या गुंतवणूकदारांना विविध प्रकारचा अल्फारुपी परतावा प्रदान करताना नाविन्यपूर्ण आविष्कार, डेटा आधारित दृष्टीकोन आणि मानवी कौशल्य यांचा मिलाफ घडवून आणला आहे आणि गेल्या ४० वर्षात यशाची अनेक शिखरे काबीज केली आहेत, असे ब्लॅकरॉक सिस्टेमॅटिकचे व्यवस्थापकीय संचालिक आणि जागतिक प्रमुख राफेल सावी म्हणाले.