मुंबई : देशातील आघाडीचे फंड घराणे असलेल्या एलआयसी म्युच्युअल फंडाने ‘एलआयसी एमएफ कंझम्पशन फंड’ हा थीमॅटिक प्रकारात फंड बाजारात आणला आहे. ग्राहक उपभोगातील सध्याच्या तेजीला अनुसरून गुंतवणुकीस कायम खुली असलेली समभागांशी संलग्न (ओपन-एंडेड इक्विटी) योजना आहे.

हा नवीन एनएफओ ३१ ऑक्टोबरपासून खुला होत असून, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी तो बंद होणार आहे. त्यानंतर पुढील महिन्यात २५ नोव्हेंबरपासून ही योजना निरंतर विक्री आणि पुनर्खरेदीसाठी पुन्हा खुली केली जाईल. सुमित भटनागर आणि करण दोशी हे या योजनेचे निधी व्यवस्थापक आहेत. ‘निफ्टी इंडिया कंझम्पशन टोटल रिटर्न इंडेक्स (टीआरआय)’ या निर्देशांकाच्या कामगिरीवर ही योजना बेतलेली असेल.

एनएफओमध्ये एकरकमी कमीत कमी ५,००० रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. दैनिक ‘एसआयपी”चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून त्यासाठी किमान रक्कम १०० रुपये निश्चित केली गेली आहे, तर मासिक एसआयपी २०० रुपये आणि १,००० रुपयांची तिमाही एसआयपी करणे गुंतवणूकदारांना शक्य आहे.

मागणी आणि उपभोग-संबंधित क्षेत्रांमध्ये गुंतलेल्या कंपन्यांच्या समभाग आणि समभागाशी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना दीर्घकालीन भांडवल वृद्धी देण्याचे योजनेचे उद्दिष्ट आहे. योजनेच्या एकूण मालमत्तेपैकी ८० ते १०० टक्के निधी हा याच क्षेत्रातील समभाग आणि समभागसंलग्न साधनांमध्ये विभागण्यात येईल, तर मालमत्तेपैकी २० टक्क्यांपर्यंत उपभोग या प्राथमिक संकल्पनेच्या (थीम) बाहेर गुंतवणूक करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे. शिवाय, ही योजना वेगवेगळ्या बाजार भांडवलात वैविध्यपूर्ण गुंतवणूक करेल.

येत्या काही वर्षांत भारतात मोठ्या प्रमाणात ग्राहक उपभोग वाढण्याची अपेक्षा आहे. भारताच्या उपभोग-प्रवणतेला चालना देणारी कारणे म्हणजे वाढता मध्यमवर्ग, विशालतम कामकरी लोकसंख्या, दरडोई उत्पन्नांतील वाढ, गतिमान शहरीकरण आणि डिजिटलायझेशन अशी आहेत. देश येत्या काही वर्षात उपभोग शक्तिकेंद्र बनवण्याची तयारीत आहे, असे एलआयसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. झा म्हणाले.

जागतिक व्यवस्थेतील धोरणात्मक स्थिती, मजबूत मूलतत्त्वे, निरंतर सुरू असलेल्या संरचनात्मक सुधारणा आणि उत्कृष्ट जीडीपी वाढ लक्षात घेता, उपभोगातील तेजीचे चक्र एक दशक किंवा त्याहून अधिक काळ सुरू राहण्याची शक्यता आहे. सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून भारतातील विवेकाधीन खर्चात वाढ होत आहे. वाढत्या आकांक्षा असलेला मध्यमवर्गीय, वाढते क्रयक्षम उत्पन्न आणि विकसित होत असलेल्या ग्राहकांच्या पसंतींमुळे हे बदल घडत आहेत, असे एलआयसी म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी-इक्विटी योगेश पाटील म्हणाले.