लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने जूनअखेर तिमाहीत ९,५४४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवल्याचे गुरुवारी जाहीर केले. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तिचा निव्वळ नफा ६८३ कोटी रुपयांचा होता.
एप्रिल-जून २०२३ तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न १,८८,७४९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे मागील वर्षीच्या याच कालावधीत १,६८,८८१ कोटी रुपये नोंदवले गेले होते. मात्र नवीन व्यवसायातील हप्त्यांपोटी मिळणाऱ्या उत्पन्नात घसरण झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते ७,४२९ कोटी रुपये होते, जे आता ६,८११ कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. मात्र वार्षिक आधारावर नवीन व्यवसायातील हप्त्यांपोटी मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली आहे. ते गेल्या वर्षीच्या ५०,२५८ कोटींच्या तुलनेत वाढून नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात ५३,६३८ कोटी रुपये झाले आहे.
गेल्या आर्थिक वर्षातील म्हणजेच २०२२-२३ च्या एप्रिल ते जून या कालावधीतील गुंतवणुकीतून मिळणारे निव्वळ उत्पन्न ६९,५७१ कोटी रुपये होते. ते आता वाढून ९०,३०९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एलआयसीचे सॉल्व्हन्सी मार्जिन एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत १.८८ टक्क्यांच्या तुलनेत १.८९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. गुरुवारच्या सत्रात एलआयसीचा समभाग १.८५ रुपयांच्या घसरणीसह ६४२.१० रुपयांवर स्थिरावला. सध्याच्या समभागाच्या बाजारभावानुसार कंपनीचे बाजारभांडवल ४,०६,१२८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.