L&T loses Rs 70,000 crore submarine deal : लार्सन अँड टुब्रो (L&T) कंपनी गेल्या काही दिवसांपासून सतत या ना त्या कारणांमुळे चर्चेत आहे. नुकतेच कंपनीचे अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम करावे असे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. यानंतर आता कंपनीला मोठा फटका बसला असून, त्यांचे तब्बल ७०,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. संरक्षण मंत्रालयाने नियमांचे पालन न केल्याचे कारण देत सहा पाणबुड्या बांधण्यासाठी एल अँड टी ची निविदा रद्द केली आहे.
एल अँड टी चे अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांना रविवारसह आठवड्यातून ९० तास काम करावे, असे विधान केलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. या प्रकरणावर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.
एल अँड टीने स्पॅनिश सरकारची जहाजबांधणी कंपनी नवांटियासोबत भागीदारीत, प्रोजेक्ट ७५ इंडिया अंतर्गत भारतीय नौदलाला सहा प्रगत पाणबुड्या बांधून देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रगत पाणबुड्या तीन आठवड्यांपर्यंत पाण्याखाली राहण्यासाठी डिझाइन करण्यात येणार होत्या. असे वृत एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
७० हजार कोटी रुपयांचे नुकसान
निविदा तपशीलांमध्ये नमूद केल्याप्रमाणे, एल अँड टीने भारतीय नौदलाच्या जहाजांच्या आवश्यकता पूर्ण न केल्यामुळे या प्रकल्पाची निविदा नाकारण्यात आली. यामुळे एल अँड टी या बहुराष्ट्रीय उद्यग समूहाचे ७०,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
एल अँड टी व नवांटियाने स्पेनमध्ये त्यांच्या महत्त्वाच्या एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन प्रणालीचे प्रात्यक्षिक भारतीय नौदलाला दाखवले होते, परंतु हे किनाऱ्यावर आधारित प्रात्यक्षिक होते. भारतीय नौदलाच्या निविदेसाठी समुद्रात आधीच सिद्ध झालेली प्रणाली आवश्यक होती.
आता माझगाव डॉक एकमेव दावेदार
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, यामुळे आता भारतीय नौदलासाठी सहा पाणबुड्या बांधण्याच्या करारासाठी सरकारी मालकीची माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि तिची भागीदार, जर्मनीची थायसेनक्रुप मरीन सिस्टम्स, एकमेव उरलेली दावेदार म्हणून उरली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd