पीटीआय, नवी दिल्ली

विद्यमान आर्थिक वर्षातील सप्टेंबर तिमाहीत प्रवासी आणि वाणिज्य वाहन विक्रीत महाराष्ट्र राज्याने आघाडी घेतली आहे, तर याच कालावधीत दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या श्रेणींमध्ये उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे, असे वाहन क्षेत्राची नेतृत्वदायी संघटना ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’च्या (सियाम) मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीने चित्र स्पष्ट केले.

जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत देशात १०.३९ लाख प्रवासी वाहने विकली गेली, ज्यामध्ये पश्चिम विभागाने ३.४४ लाख वाहन विक्रीसह आघाडी घेतली, असे सियामने म्हटले आहे. प्रवासी वाहनांच्या विभागात, महाराष्ट्राने १२.७ टक्के योगदान देत १,३१,८२२ वाहनांची विक्री केली, त्यानंतर उत्तर प्रदेशने १,००,४८१ वाहने (९.७ टक्के) आणि गुजरातने ८७,९०१ वाहन विक्री (८.५ टक्के) नोंदवून तिसरे स्थान पटकावले. आकडेवारीनुसार, कर्नाटक (७६,४२२ वाहने, ७.४ टक्के) चौथ्या आणि केरळ (६९,६०९ वाहने, ६.७ टक्के) पाचव्या क्रमांकावर आहे.

सियामने म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशभरात वाणिज्य वाहनांच्या श्रेणीत २.४० लाख वाहने विकली गेली, तर पश्चिम विभागाने ९२,००० वाहनांच्या विक्रीसह आघाडी राखली. राज्यनिहाय आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात ३७,०९१ (१५.५ टक्के वाटा) वाणिज्य वाहने विकली गेली, त्यानंतर गुजरात २२,४९१ (९.४ टक्के) वाणिज्य वाहनांसह दुसऱ्या स्थानी आहे आणि उत्तर प्रदेश १९,००९ तिसऱ्या स्थानावर आहे, असे सियामने म्हटले आहे. तमिळनाडूमध्ये १८,५०८ वाणिज्य वाहनांची विक्री झाली ते चौथ्या स्थानावर आहे आणि कर्नाटक १६,७४३ (७ टक्के) पाचव्या स्थानावर आहे, असे त्यात म्हटले आहे.

दुचाकी वाहनांच्या बाबतीत, देशात सप्टेंबर तिमाहीत ५५ लाख ६२ हजार दुचाकींची विक्री झाली. उत्तरप्रदेशात ६.९२ लाख दुचाकी विकल्या गेल्या असून ते पहिल्या स्थानी आहे. महाराष्ट्रात ६.२९ लाख (११.३ टक्के) दुचाकींची विक्री झाली आहे. तर याच कालावधीत देशभरात २.२९ लाख तीनचाकी वाहनांची विक्री झाली आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक २८,२४६ तीनचाकी वाहनांची विक्री झाली आहे. सियामच्या आकडेवारीनुसार, २१,१०० तीनचाकी वाहनांच्या विक्रीसह महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे.