मुंबई : देशातील बाजार भांडवलाच्या दृष्टीकोनातून सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत १८,१६५ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदविल्याचे शुक्रवारी जाहीर केले.

सरलेल्या तिमाहीत कंपनीने सर्वच आघाड्यांवर प्रगती साधली. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात ९.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र पहिल्या तिमाहीच्या तुलनेत नफा कमी झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील नफा १६,६५३ कोटी रुपयांपेक्षा अधिक होता. मात्र चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील (एप्रिल-जून) नफ्याच्या तुलनेत यंदा कंपनीचा निव्वळ नफा ३३ टक्क्यांनी घटला आहे. कंपनीचा महसूल गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीतील २.३५ कोटी रुपयांवरून, यंदा २.५९ कोटी रुपये पातळीपर्यंत वाढला आहे.

किराणा व्यवसायातील रिलायन्स रिटेल, दूरसंचार क्षेत्रातील कंपनी जिओची मजबूत कामगिरी आणि त्यांच्या मुख्य तेल शुद्धीकरण कंपनीच्या व्यवसाय पुनर्प्राप्तीमुळे कंपनीला चांगला नफा कायम राखता आला. मात्र उच्च इन्व्हेंटरी तोट्याचा एकूण नफ्यावर परिणाम झाला, ज्यामुळे मागील तिमाहीच्या तुलनेत नफ्यात क्रमिक घट झाली.

नवीन ग्राहकांची भर आणि प्रति वापरकर्ता उत्पन्नात वाढ, वायरलेस ब्रॉडबँड सेवा जगातील सर्वात मोठी कंपनी बनल्याने दूरसंचार कंपनीच्या कमाईत वार्षिक आधारावर १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे खनिज तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे दुसऱ्या तिमाहीत इन्व्हेंटरी वाहून नेण्याचे मूल्य अनुक्रमे कमी झाले. मात्र पहिल्या तिमाहीच्या तुलनेत इन्व्हेंटरी तोटा दुप्पट होऊन ८,४२१ कोटी रुपये झाला आहे.

कंपनीचा करपूर्व नफ्यात १४.६ टक्क्यांची वाढ झाली असून तो ५०,३६७ कोटी रुपये झाला. कर्जाच्या वाढत्या भारामुळे कंपनीच्या खर्चात १३.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत कंपनीवर ३.४८ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा होता. तसेच, घसारा वार्षिक १२ टक्क्यांनी वाढून १४,४१६ कोटी रुपये झाला.

जिओला ७,३७९ कोटींचा नफा

जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडचा नफा दुसऱ्या तिमाहीत १३ टक्क्यांनी वाढून ७,३७९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. विदा वापर आणि सरासरी प्रति वापरकर्ता कमाई आणि ग्राहकांची संख्या – हे प्रमुख घटक वाढले आहेत. एप्रिल-जूनमध्ये ग्राहकांची संख्या ४९.८१ कोटींवरून ५०.६४ कोटींवर पोहोचली आहे. प्रति वापरकर्ता सरासरी महसूल मागील तिमाहीत २०८.८ रुपयांवरून २११.४ रुपये झाला.

किरकोळ वस्तू आणि किराणा विक्री कंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या नफ्यात २२ टक्क्यांनी वाढ होऊन तो ३,४५७ कोटी रुपये झाला आहे. कंपनीने २२९ नवीन दालने उघडून ही संख्या १९,८२१ वर नेली.

रिलायन्सने विद्यमान आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जिओ आणि रिटेल व्यवसायांच्या भरीव योगदानामुळे चांगली कामगिरी केली. ऊर्जा, मीडिया आणि ग्राहक ब्रँड हे विकासाचे इंजिन आहे. रिलायन्स नवतंत्रज्ञान आणि नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करून भारतीय ग्राहकांना योग्य किमतीत योग्य उत्पादने आणि सेवा प्रदान करत राहील. – मुकेश अंबानी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक , रिलायन्स इंडस्ट्रीज.