वृत्तसंस्था, नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या आठवड्यात आखाती देशांमधून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केली. याचबरोबर भविष्यात तेल खरेदीसाठी आणखी करारही करण्यात आले आहेत. रशियाकडून होत असलेल्या तेल खरेदीबाबत अमेरिकेने तीव्र आक्षेप घेतल्याने रिलायन्सने आता आखाती देशांकडे मोर्चा वळविला आहे.

रिलायन्सने आखाती देशांकडून खनिज तेलाची किमान २५ लाख पिंपे खरेदी केली आहेत. त्यात इराकमधील बसराह मिडियम, अल शाहीन आणि कतार लँड या खनिज तेलाच्या खरेदीचा समावेश असल्याचे व्यापाऱ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. रिलायन्सकडून सुरूवातीला या भागातील खनिज तेलाच्या खरेदीला प्राधान्य दिले जात नव्हते. आता मात्र कंपनीकडून या तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढल्याकडेही व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले.

युक्रेनमधील युद्ध थांबविण्यासाठी अमेरिकेकडून रशियावर दबाव आणला जात आहे. याचाच भाग म्हणून रशियातील खनिज तेलाच्या खरेदीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. या महिन्याच्या सुरूवातीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबविल्याचा दावा केला होता. मात्र, भारताने याला दुजोरा दिला नव्हता. भारतातील तेल शुद्धिकरण कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याची भूमिका घेतली असली तरी खरेदी पूर्णपणे थांबविण्यास नकार दिला आहे.

युरोपीय समुदायाने रशियातून तेलाची आयात करण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी २१ जानेवारीपासून लागू होणार आहे. याचा फटका रिलायन्सच्या तेल शुद्धिकरण उत्पादनांच्या निर्यातीला बसू शकतो. कारण रशियातील खनिज तेलापासून उत्पादित उत्पादनांना युरोपातील देशांकडून निर्बंध लागू होणार आहेत. युरोपीय समुदायाच्या मार्गदर्शक नियमावलीत भारताचाही उल्लेख असून, योग्य खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, रिलायन्सने या तेल खरेदीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

भारतातील सर्वांत मोठा खरेदीदार

रशियातील खनिज तेलाची भारतातील सर्वांत मोठी खरेदीदार कंपनी रिलायन्स आहे. रिलायन्सकडून आता रशियातील खनिज तेलासारख्या तेलाचा शोध सुरू आहे. याबाबत आखाती देशांतील तेल पुरवठादारांकडे कंपनीकडून विचारणा केली जात आहे. अशा प्रकारचे तेल मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी कंपनीकडून चौकशी सुरू आहे, असेही व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.