मुंबई : रिझर्व्ह बँकेकडील सोन्याचा साठा सप्टेंबर अखेर ८८० मेट्रिक टनांवर पोहोचला आहे. मागील महिनाभराच्या कालावधीत सोन्याच्या साठ्यात २५.४५ मेट्रिक टनांनी भर पडली आहे. सप्टेंबर २०२४ अखेरीस मध्यवर्ती बँकेकडे सोन्याचा साठा ८५४.७३ मेट्रिक होता. त्यावरून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या अखेरीस तो ८८०.१८ मेट्रिक टनांवर पोहोचला आहे.
रिझर्व्ह बँकेकडील ८८०.१८ मेट्रिक टन सोन्यापैकी ५७५.८२ मेट्रिक टन देशात आहे. तर बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सकडे २९०.३७ मेट्रिक टन सोने सुरक्षित ठेवण्यात आले आहे, तर १३.९९ मेट्रिक टन सोने ठेवींच्या स्वरूपात ठेवण्यात आले आहे.
मूल्याच्या दृष्टीने एकूण परकीय चलन साठ्यात सोन्याचा वाटा मार्च २०२५ अखेर ११.७० टक्क्यांवरून, सप्टेंबर २०२५ अखेर सुमारे १३.९२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, असे त्यात म्हटले आहे. मात्र, सप्टेंबर २०२५ अखेर परकीय चलन साठ्यात किरकोळ घट होऊन तो ७००.०९ अब्ज डॉलर झाला, तर सप्टेंबर २०२४ अखेर हा साठा ७०५.७८ अब्ज डॉलर होता.
