मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ४७ पैशांनी घसरून रुपयाने ८८.७५ ही ऐतिहासिक नीचांकी पातळी मंगळवारी गाठली. अमेरिकेच्या वाढीव एच-१बी व्हिसा शुल्काच्या परिणामी भारताच्या माहिती-तंत्रज्ञान सेवा निर्यातीला मोठा धक्का पोहचण्याच्या चिंतेतून रुपया गडगडल्याचे दिसून आले. तथापि रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे ही घसरण मर्यादित राखण्यास मदत झाल्याची चलन बाजारात चर्चा आहे.

एक लाख अमेरिकी डॉलर अर्थात ८८ लाख रुपयांपर्यंत वाढलेल्या एच-१बी व्हिसा शुल्काच्या संभाव्य परिणामांबाबत पुढे आलेल्या तज्ज्ञ विश्लेषणांतून बाजार सहभागींनी घेतलेल्या धसक्याने रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर घरंगळला. यातून परदेशस्थ भारतीयांकडून मायदेशात धाडला जाणारा निधी अर्थात रेमिटन्समध्ये मोठी घट होण्याच्या शक्यतेने डॉलरचा ओघही आटणार आहे. आधीच ट्रम्प आयात शुल्कामुळे अमेरिकेला होणारी निर्यात मंदावण्याच्या शक्यता असताना, त्या परिणामांना ही ताजी शुल्कवाढ आणखी गंभीर वळण देणारी ठरेल.

परकीय चलन बाजारात, रुपयाने ८८.४१ या कमकुवत पातळीवरून व्यवहारास सुरुवात केली. नंतर तो आणखी घसरून दोन आठवड्यांपूर्वी स्थापित ८८.४५ या सार्वकालिक नीचांकाला छेद देऊन, ८८.८२ या नवीन नीचांकी पातळीवर पोहोचला. अखेर किंचित सावरून ४७ पैशांच्या घसरणीसह तो प्रति डॉलर ८८.७५ पातळीवर स्थिरावला. सोमवारी, डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी घसरून ८८.२८ वर बंद झाला होता.

अमेरिकेच्या व्हिसा शुल्क वाढीच्या मुद्द्यामुळे देशांतर्गत बाजारात आयटी क्षेत्रामध्ये निराशेचे वातावरण आहे. यामुळे देशांतर्गत भांडवली बाजारातून परकीय गुंतवणूकदारांच्या निधीचे निर्गमनही तीव्र बनले आहे. त्यामुळे रुपया पुढे आणखी कमकुवत होत राहील असा विश्लेषकांमध्ये सूर आहे. खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील नरमाईमुळे रुपयाला किंचित आधार मिळण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडून रुपयातील घसरण रोखण्यासाठी हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे, असे मिरे ॲसेट शेअरखानचे चलन आणि वस्तूंचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी म्हणाले. त्यांच्या मते रुपया ८८.४५ ते ८९.२० या श्रेणीत व्यवहार करण्याची शक्यता आहे.

दाहकता किती?

‘एचएसबीसी’च्या अर्थतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, अमेरिकेतील ५४ लाख भारतीय कर्मचारी हे दरवर्षी देशात एकत्रितपणे सुमारे ३,३०० कोटी डॉलरचा निधी ‘रेमिटन्स’च्या माध्यमातून मायदेशात पाठवतात. दरवर्षी सुमारे ८०,००० नवीन व्हिसा अर्जदार पुढे येत असतात आणि जर त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळाला नाही, तर रेमिटन्सचा प्रवाह सुमारे ५० कोटी डॉलरने कमी होऊ शकतो.

सोने-चांदी दरांचा विक्रमी सूर

सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या नवीन उच्चांकासरशी, देशांतर्गत सोन्याचा भावही मंगळवारी २,७०० रुपयांनी कडाडून, प्रति १० ग्रॅमसाठी १,१८,९०० रुपये अशा अभूतपूर्व पातळीवर पोहोचल्याचे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने स्पष्ट केले. सोमवारी हाच दर १,१६,२०० रुपयांवर होता. चालू वर्षात जानेवारीपासून सोन्याच्या किमतीत ३९,९५० रुपयांची अर्थात ५०.६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे चांदीचा भाव ३,२२० रुपयांनी चढत किलोमागे १,३९,६०० रुपयांच्या अत्युच्च उच्चांकाला गाठले. चालू वर्षात आतापर्यंत चांदीने ५५.६३ टक्क्यांची भाववाढ दाखविली आहे.

सेन्सेक्स-निफ्टीची सलग तिसरी घसरण

शुक्रवारी भांडवली बाजारातील व्यवहार आटोपल्यावर ट्रम्प प्रशासनाचा एच१बी व्हिसा शुल्कवाढीचा निर्णय आला असला तरी त्या सप्ताहअखेरच्या सत्रापासून मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी हे प्रमुख निर्देशांक गडगडले. मुख्यतः परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री करून धरलेला बाहेरचा रस्ता बाजार घसरणीचे कारण ठरला आहे.