पुणे : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वेगाने वाढत असली तरी एकूण विक्रीत त्यांची संख्या अतिशय कमी आहे. ई-वाहनांची क्षमता आणि चार्जिंग सुविधा याबद्दल ग्राहक साशंक आहेत. त्यामुळे ई-वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढू शकली नाही, अशी माहिती स्कोडा इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्ता यांनी दिली.

वाघोली येथील स्कोडाच्या ढोणे मोबिलिटी या दालनाचे मंगळवारी (दि.२३) उद्घाटन झाले. या प्रसंगी ढोणे मोबिलिटीचे भागीदार संतोष ढोणे उपस्थित होते. यावेळी गुप्ता म्हणाले की, भारतात विक्री होणाऱ्या एकूण वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा केवळ ४ टक्के आहे. गेल्या वर्षीचा विचार करता ई-वाहनांच्या विक्रीचा वेग दुपटीने वाढला आहे. ई-वाहनांच्या विक्रीचा वेग अधिक असला तरी त्यात संख्यात्मक वाढ फारशी होताना दिसत नाही. त्यामुळे जागतिक पातळीपेक्षा भारतात ईव्हीचा स्वीकार तुलनेने खूपच कमी आहे.

केंद्र सरकारने २०३० पर्यंत वार्षिक वाहन विक्रीतील ३० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्याची ई-वाहनांची विक्री पाहता हे उद्दिष्ट गाठणे अवघड आहे. आपल्याला तोपर्यंत एकूण वाहन विक्रीत ई-वाहनांचे प्रमाण १५ ते १८ टक्क्यांपर्यंत ईव्हीची संख्या नेणे शक्य होईल. असे असले तरी आगामी काळात ई-वाहनांची संख्या वाढत जाणार आहे. त्यामुळे भविष्यात स्कोडाकडूनही ई-मोटारी सादर केल्या जातील, असे गुप्ता यांनी नमूद केले.

ग्राहकांचा वाढता प्रतिसाद

वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) कपातीनंतर ग्राहकांचा प्रतिसाद वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोटारींच्या बुकींगमध्ये ५० ते ६० टक्के वाढ झाली आहे. या आठवड्यांच्या अखेरपर्यंत मागणीत आणखी वाढ होईल, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.