जागतिक भांडवली बाजारातील कमकुवत कल आणि माहिती-तंत्रज्ञान, धातू, भांडवली वस्तूंच्या समभागांमध्ये नफावसुली केल्याने सहा सत्रातील तेजीची मालिका खंडित झाली, तर सेन्सेक्स जवळजवळ २७८ अंशांनी घसरला आणि निफ्टी २६,००० पातळीच्या खाली बंद झाला.

मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्स २७७.९३ अंशांनी घसरून ८४,६७३.०२ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ३९२.५९ अंश गमावत ८४,५५८.३६ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. तर दुसरीकडे निफ्टी १०३.४० अंशांनी घसरून २५,९१०.०५ पातळीवर बंद झाला.

अलीकडील बाजारातील तेजीनंतर गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली. डिसेंबरमध्ये अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीच्या अपेक्षा कमी झाली आहे. ज्याचा तेथील बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. मजबूत डॉलरमुळे माहिती-तंत्रज्ञान, धातू आणि गृहनिर्माण समभाग घसरले, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये टेक महिंद्र, इन्फोसिस, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इटर्नल, अदानी पोर्ट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स हे निर्देशांक घसरणीस कारणीभूत ठरले. तर भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, एशियन पेंट्स आणि टायटन यांनी घसरणीतून बाजाराला सावरले.