लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: जगभरात रोख्यांवरील वाढता परतावा आणि जागतिक अर्थसत्ता अमेरिकेवरील वाढती कर्जपातळी या चिंतेने जागतिक बाजारात गुरुवारी दिसलेल्या अस्वस्थतेचे प्रतिकूल पडसाद म्हणून ‘सेन्सेक्स’ सुमारे ६४५ अंशांनी घसरला.माहिती तंत्रज्ञान (आयटी), तेल आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रांमधील समभागांमध्ये विक्रीचा मारा सुरू राहिल्याने दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ६४४.६४ अंशांनी म्हणजेच ०.७९ टक्क्यांनी घसरून ८०,९५१.९९ पातळीवर स्थिरावला. सत्रातंर्गत सेन्सेक्स १,१०६.७१ अंशांनी गडगडला होता, मात्र सत्र समाप्तीच्या शेवटच्या काही मिनिटांत त्याने ही घसरण जवळपास निम्म्याने भरून काढणारी उभारी दाखविली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २०३.७५ अंशांची (०.८२ टक्के) घसरण झाली आणि तो २४,६०९.७० पातळीवर बंद झाला.

अमेरिकेच्या राष्ट्रीय कर्जातील वाढ आणि राजकोषीय चिंतेमुळे प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण झाली. एका प्रमुख पतमानांकन संस्थेने अमेरिकेच्या पतविषयक दृष्टिकोनांत बदल केल्याने आशियाई बाजारपेठांमध्ये सुरू झालेल्या व्यापक विक्रीनेही स्थानिक बाजारावर नकारात्मक ताण आणला, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

अमेरिकेतील रोख्यांवरील परतावा ५ टक्क्यांपर्यंत पोहोचला तर जपानी रोख्यांचा परतावा दर ३.५ टक्क्यांपर्यंत वाढला. यामुळे समभागांसाठी जोखीमयुक्त मालमत्तांकडे पाठ करण्याचा कल दिसून आला आणि भारतासारख्या उभरत्या बाजारपेठेत विक्रीला चालना मिळाली.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी, महिंद्र अँड महिंद्र, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्र, पॉवर ग्रिड, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मारुती या कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर इंडसइंड बँक, भारती एअरटेल आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग तेजीसह स्थिरावले.

रुपयात ३७ पैशांची घसरण

मुंबई: आयातदार आणि परदेशी बँकांकडून डॉलरची वाढती मागणी तसेच खनिज तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने गुरुवारी रुपया ३७ पैशांनी घसरून ८५.९६ वर बंद झाला. परदेशी चलन व्यापाऱ्यांच्या मते, अमेरिकी रोखे उत्पन्नातील वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शिवाय, भारत आणि अमेरिकेतील कमी होत चाललेली उत्पन्न तफावत भारतीय बाजारपेठांना कमी आकर्षक बनवत आहे. अरब राष्ट्रांमधील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे खनिज तेलाच्या किमती वाढल्याने गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे. परकीय चलन बाजारात, रुपयाने ८५.५९ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभरातील सत्रात त्याने ८५.५८ हा उच्चांक आणि ८६.११ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. दिवसअखेर तो किंचित सावरून ८५.९६ वर बंद झाला.