लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात बँकिंग आणि निवडक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या खरेदीच्या जोमाने ‘सेन्सेक्स’ने मंगळवारच्या सत्रात २७० अंशांची कमाई केली. तसेच निफ्टीनेदेखील भारत-अमेरिका व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर २५,५०० अंशांची पातळी कायम राखली आहे. सत्राअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २७०.०१ अंशांनी वधारून ८३,७१२.५१ पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्सने ८३,८१२.३१ अंशांचा उच्चांक, तर ८३,३२०.९५ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ६१.२० अंशांची वाढ झाली आणि तो २५,५२२.५० पातळीवर बंद झाला.

अमेरिकेने अतिरिक्त कर आकारणीबाबत स्थगितीचा कालावधी १ ऑगस्टपर्यंत वाढवला असला तरी गुंतवणूकदार प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापाराबाबत सकारात्मक घोषणेची प्रतीक्षा करत आहेत. परिणामी, देशांतर्गत आघाडीवर ठरावीक कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदी निदर्शनास आली. याआधी बहुतेक सत्रांमध्ये भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक एका मर्यादित श्रेणीत व्यवहार करत होते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी, कोटक महिंद्र बँक, एशियन पेंट्स, एनटीपीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, अदानी पोर्ट्स, इन्फोसिस आणि स्टेट बँक यांचे समभाग तेजीत होते. मात्र, टायटनचा समभाग ६ टक्क्यांहून अधिक घसरले. त्यापाठोपाठ ट्रेंट, ॲक्सिस बँक, मारुती आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांची कामगिरी निराशाजनक राहिली.

व्यापार कराराबाबत उत्सुकता

अमेरिका भारतासोबत व्यापार करार करण्याच्या समीप पोहोचला आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. याआधी इंग्लंड आणि चीनसोबत करार केल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय ट्रम्प प्रशासनाने सोमवारी विविध देशांना अमेरिकेत येणाऱ्या त्या देशांच्या उत्पादनांवर अमेरिका किती शुल्क लावणार आहे याबाबत माहिती दिली. ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेले हे पत्र ज्या देशांना मिळाले त्यात बांगलादेश, बोस्निया आणि हर्जेगोविना, कंबोडिया, इंडोनेशिया, जपान, कझाकस्तान, लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक, मलेशिया, सर्बिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, थायलंड आणि ट्युनिशिया यांचा समावेश आहे.

भारत-अमेरिका व्यापार कराराच्या प्रतीक्षेत देशांतर्गत भांडवली बाजार मंगळवारच्या सत्रात मर्यादित श्रेणीत व्यवहार करत होते. संभाव्य कराराबद्दल गुंतवणूकदार आशावादी असले तरी, औपचारिक पुष्टी न मिळाल्याने भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी मर्यादित व्यवहार करत सावध पवित्रा घेतला.- विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड

सेन्सेक्स ८३,७१२.५१ २७०.०१ ( ०.३२%)

निफ्टी २५,५२२.५० ६१.२० ( ०.२४%)

तेल ६९.१७ -०.५९

डॉलर ८५.६८ -२६ पैसे