मुंबई: सरलेल्या सप्टेंबर महिन्यांत देशातील समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ९ टक्क्यांनी घसरून ३०,४२२ कोटी रुपयांवर सीमित राहिली. मुख्यत: सेक्टोरल आणि थीमॅटिक फंडांकडे गुतवणूकदारांनी पाठ फिरविल्याचा, एकूण प्रवाहावर परिणाम झाला, असे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (ॲम्फी) शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले.
जागतिक व्यापार चिंतेदरम्यान परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या तब्बल २.७ अब्ज डॉलरच्या समभाग विक्रीच्या परिणामी शेअर बाजारात दिसून आलेल्या अस्थिरतेनेही इक्विटी फंडातील ओघावर मर्यादा घालणारा प्रभाव साधला. मात्र याचवेळी सोने-चांदी या मौल्यवान धातूंमधील गुंतवणुकीने विक्रमी उच्चांक गाठला.
इक्विटी फंडांतील एकूण गुंतवणूक ओघ आटला असतानाही, गुंतवणूकदारांनी मासिक गुंतवणूक योजना अर्थात ‘एसआयपी’द्वारे पैसा ओतणे सुरू ठेवले असून, सप्टेंबरमधील ‘एसआयपी’द्वारे ४.२ टक्क्यांनी वाढून २९,४६१ कोटी रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले. यातून म्युच्युअल फंडांकडून बाजारात झालेल्या समभाग खरेदीमुळे, परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या तीव्र विक्रीचा परिणाम कमी होण्यास मदत झाली. गेल्या महिन्यात अव्याहत सुरू राहिलेल्या देशांतर्गत गुंतवणूक प्रवाहामुळे, सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक प्रत्येकी पाऊण टक्क्यांनी वाढले आहेत.
सप्टेंबरमध्ये सलग दुसऱ्या महिन्यांत गुंतवणूक प्रवाह आटला असला तरी, फेब्रुवारी २०२१ पासून इक्विटी फंडांतील मासिक गुंतवणूक सतत सकारात्मकपणे सुरू आहे. सरकारकडून सुरू राहिलेला सुधारणांचा आग्रह आणि त्याला सहाय्यक रिझर्व्ह बँकेच्या धोरणांमुळे ही सकारात्मकता दिसली आहे, असे टाटा अॅसेट मॅनेजमेंटचे मुख्य व्यवसाय अधिकारी आनंद वरदराजन म्हणाले.
एकूण म्युच्युअल फंड प्रवाहात मोठ्या प्रमाणात घट होण्यास हातभार लावणाऱ्या सेक्टोरल आणि थीमॅटिक फंडातील गुंतवणूक प्रवाह गेल्या महिन्यात तब्बल ६९ टक्क्यांनी घसरून १,२२१ कोटी रुपयांवर सीमित राहिला. या दोन फंड प्रकारामध्ये ऑगस्टमधील दोनच्या तुलनेत फक्त एक नवीन योजना सप्टेंबरमध्ये सुरू झाली. इतर श्रेणींमध्ये, मल्टी-कॅप फंडांमध्ये गुंतवणूक प्रवाह ११.५ टक्क्यांनी वाढून ३,५६० कोटी रुपयांवर पोहोचला, तर स्मॉल-कॅप आणि मिड-कॅप फंडांमध्ये अनुक्रमे १२.६ टक्के आणि ४.६ टक्क्यांची घट झाली, तर लार्ज-कॅप गुंतवणूक १८.२ टक्क्यांनी घसरून २,३१९ कोटी रुपये पातळीवर होती.
सोने-चांदीचे आकर्षण…
सोने आणि चांदीने देखील गुंतवणूकदारांना सप्टेंबरमध्ये आकर्षित केले. या मौल्यवान धातूंच्या गोल्ड आणि सिल्व्हर एक्सचेंज ट्रेडेड फंडांमध्ये (ईटीएफ) अनुक्रमे ८,३६३ कोटी रुपये आणि ५,३४२ कोटी रुपये अशी विक्रमी मासिक गुंतवणूक झाली. जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात, मौल्यवान धातूंच्या अस्मान गाठलेल्या किमतीचा फायदा या माध्यमातून मिळविता येऊ शकेल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. दरम्यान अल्पकालीन पुरवठ्याच्या कमतरतेमुळे गुंतवणूकदारांचे संरक्षण करण्यासाठी कोटक महिंद्र अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने गुरुवारी त्यांच्या सिल्व्हर फंड-ऑफ-फंडमधील नवीन एकरकमी गुंतवणूक तात्पुरती थांबवली आहे. पुरवठा स्थिती सुधारल्यास ती पुन्हा खुली होईल, असे या फंड घराण्याने स्पष्ट केले असले, तरी अन्य फंडांमध्ये गुंतवणुकीवर असे काही निर्बंध येण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.